'मला पंकजा मुंडे व्हायचंय'; चिमुकलीस नेतृत्वाची भुरळ, भेटीसाठी खास नांदेडहून परळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 04:02 PM2023-05-08T16:02:10+5:302023-05-08T16:04:12+5:30
नांदेडहून आई-वडिलांना घेऊन खास भेटायला आली परळीत
परळी ( बीड) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात व राज्याबाहेरही आहे. सर्व सामान्य घटकांमध्ये त्या विशेष लोकप्रिय आहेत. केवळ तरूण, तरूणीच नाही तर लहान मुलेही त्यांच्या व्यक्तिमत्वापासून प्रभावित होतात. त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाची अशाच एका पाच वर्षाच्या चिमुकलीला देखील भुरळ पडली आणि ती त्यांना खास भेटायला म्हणून नांदेडहून आई-वडिलांना घेऊन परळीला येऊन गेली.
झालं असं, नांदेड येथील साईनाथ हामंद यांची पाच वर्षे वयाची चिमुकली शर्वरी हिला पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचं प्रचंड वेड. त्यांची भाषणे, मुलाखती ती टीव्ही, सोशल मिडीयाच्या माध्यमातून सातत्याने पाहते. पंकजा मुंडे यांच्यातील कणखरपणा तीला खास करून आवडतो. त्यामुळे त्यांना एकदा तरी जवळून भेटता यावं, बोलावं अशी चिमुकलीची मनापासून इच्छा होती.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना परळीत जाऊन भेटण्याचा हट्ट तिने आई-वडिलांकडे हट्ट धरला. ती त्यांना भेटायला परळीला त्यांच्या घरी आली. पंकजा मुंडे देखील तिला भेटल्या, जवळ घेतलं, तिच्याशी छान गप्पा मारल्या, सुरेल आवाजातील तिचं गाणंही ऐकलं. फोटोही काढले. एवढया लहान वयात तिच्यातील गुणांचं त्यांना नवल वाटलं, त्यांनी तिचं कौतुक करत शाबासकी दिली. शर्वरीसारखी चुणचुणीत मुलगी आपली फॅन असल्याचं पाहून त्याही क्षणभर भारावून गेल्या.