लई आनंद झाला! कष्टाला साेनेरी झळाळी मिळाल्याने अविनाशचे आई- वडिल भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 04:05 PM2023-10-02T16:05:54+5:302023-10-02T16:06:47+5:30
मांडव्याचं अस्सल सोनं चीनमध्ये चमकलं; ग्रामस्थांनी अविनाश साबळेच्या आई -वडिलांचा केला सत्कार
- नितीन कांबळे
कडा (जि. बीड) : चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील अविनाश साबळे याने स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावत बाजी मारली. यामुळे भारतासह आष्टीकरांची मान पुन्हा एकदा उंचावली असून ही वार्ता कळताच तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेती आणि मजुरीवर जीवन जगणाऱ्या दुर्गम भागातील मांडव्याचं अस्सल सोनं चीनमध्ये चमकलं, अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी व्यक्त केल्या.
आष्टीपासून ८ व कड्यापासून ७ किलोमीटर अंतरावर १६०० लोकवस्ती असलेल्या मांडवा येथील ग्रामस्थ शेती, दुग्ध व्यवसाय आणि ऊस तोडणीसाठी मजुरीला जातात. हे गाव विकासापासून वंचित राहिले आहे. येथील मुकुंद साबळे यांच्या कष्टकरी कुटुंबात अविनाशचा जन्म झाला. वडील मुकुंद आणि आई वैशाली कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रतिकूलतेशी झगडत होते. कधी ऊस तोडणीला जायचे, तर कधी जवळच्या वीटभट्टीवर काबाडकष्ट करायचे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेले हे कुटुंब मोलमजुरी करीत कामाच्या ठिकाणी सोबत असणारा अविनाश खेळत असे. यातूनच त्याला धावण्याची आवड निर्माण झाली. वयाच्या सहाव्या वर्षापासून तो सराव करीत होता. कडा येथील अमोलक विद्यालयात शिक्षणानंतर त्याने छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण घेतले.
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन रक्ताचे पाणी करत त्याने मैदानी खेळाला चॅलेंज केले व आगळे वेगळे करिअर करण्याचे ध्येय समोर ठेवले होते. शेरी- मांडवा रोडवर तो धावण्याचा सराव करीत राहिला. त्यानंतर अविनाश भारतीय सैन्य दलात देशसेवेसाठी सामील झाला. परंतु, धावण्याच्या सरावात सातत्य ठेवले. आता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत त्याने आकाशाला गवसणी घातली आहे. अविनाशला मिळालेल्या गोल्ड मेडलबद्दल गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मांडव्याचं अस्सल सोनं चीनमध्ये चमकलं; ग्रामस्थांनी अविनाश साबळेच्या आई -वडिलांचा केला सत्कार#AvinashSable#AsianGames#beedpic.twitter.com/GDTFCUOl37
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 2, 2023
आई म्हणून काय वाटणार? लई आनंद झाला
अविनाशच्या सुवर्णपदकाबाबत विचारले असता, आई म्हणून काय वाटणार? लय काबाड कष्टातून त्यानं नाव कमवलं आहे. आमचं स्वप्न पूर्ण केले असून भविष्यात आणखी नाव मोठं करावं. इतर मुलांनीदेखील त्याच्या सारखं नाव करावं, असे अविनाशची आई वैशाली मुकुंद साबळे म्हणाल्या.
मांडव्याचा हिरा
अविनाश आमच्या गावचा हिरा असून त्याने आजवर विविध स्पर्धेत सहभाग घेऊन मांडव्याचे नाव देशात गाजवले. ते आता साता समुद्रापार पोहोचविले आहे. आमच्या गावच्या तरुणाचा सार्थ अभिमान वाटतो, असे मांडवा येथील माजी सरपंच देवा धुमाळ यांनी सांगितले.
दादाच्या कामगिरीचा अभिमान
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर व आई-वडिलांच्या आशीर्वादाने मोठा भाऊ गावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवतोय याचा अभिमान वाटत असल्याचे सांगताना लहान भाऊ योगेश साबळे गहिवरून गेला.
अविनाशच्या यशाचा अभिमान
अविनाशने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला सार्थ अभिमान असल्याचे मांडवा गावचे उपसरपंच संतोष मुटकुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.