संघर्षात साथ दिलेल्यांना मी कदापिही विसरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:29+5:302021-07-16T04:24:29+5:30

परळी : पूर्वीच्या संघर्षाच्या काळात, ज्या सहकारी, कार्यकर्त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही; माझी साथ देण्यामुळे त्यांना अडचणीत ...

I will never forget those who helped me in the struggle | संघर्षात साथ दिलेल्यांना मी कदापिही विसरणार नाही

संघर्षात साथ दिलेल्यांना मी कदापिही विसरणार नाही

Next

परळी : पूर्वीच्या संघर्षाच्या काळात, ज्या सहकारी, कार्यकर्त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही; माझी साथ देण्यामुळे त्यांना अडचणीत आणण्यात आले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे माझ्या हृदयात स्थान आहे. कोविडविषयक निर्बंध असल्यामुळे जरी सतत भेटीगाठी होत नसल्या तरी माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या एकाही सहकाऱ्याचा मी विसर पडू देणार नाही, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला. यावेळी धनंजय मुंडे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.

समाजकारण आणि राजकारणात मी आज उभा आहे त्यामध्ये जनतेचे मला मिळालेले अभूतपूर्व प्रेम व आशीर्वाद हीच माझी शिदोरी आहे. आज मी राजकारणात जो काही आहे, तो जनतेच्या आशीर्वादाने व सर्व सहकारी-कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळेच आहे. अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करीत राहून हे प्रेम व विश्वास जपून ठेवणे हे माझे आद्यकर्तव्य आहे, असे भावनिक मत धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

परळी येथे मुंडे यांचा अत्यंत साधेपणाने व कौटुंबिक वातावरणात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुंडेंच्या आई रुक्मिणीबाई मुंडे, राजश्री धनंजय मुंडे यांनी औक्षण केले. त्यानंतर परळीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुंडेंचा हृद्य सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी आमदार संजय दौंड, मुंडेंच्या आई रुक्मिणीबाई मुंडे, राजश्रीताई धनंजय मुंडे, काकी कमलबाई मुंडे, बंधू अजय मुंडे, रामेश्वर मुंडे, अभय मुंडे, भगिनी ऊर्मिला केंद्रे, मनीषा अजय मुंडे यांसह मुंडे कुटुंबीय उपस्थित होते. कोरोनाविषयक नियम व शिस्तीचे पालन करून नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड व सहकाऱ्यांनी या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद महाराज केंद्रे यांनी केले.

जन्मदिनाच्या निमित्ताने सबंध परळी शहर सजले असून, मुंडे यांचा जन्मदिन (१५ जुलै) ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्मदिन (२२ जुलै) असा सात दिवसांचा आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त गुरुवारी परळी तसेच अन्य ठिकाणी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले.

Web Title: I will never forget those who helped me in the struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.