बहुजनांपर्यंत पोहोचलेला पक्ष पुन्हा मूठभरांच्या हाती देऊ नका: पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 05:39 AM2019-12-13T05:39:37+5:302019-12-13T06:53:21+5:30
मी पक्ष सोडणार नाही, पक्षाने काय ते ठरवावे
बीड: माझे वडील स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मूठभरांच्या हाती असलेला पक्ष बहुजनांपर्यंत पोहचविला. तो माघारी आणू नका. बंडखोरी, बेईमानी, विश्वासघात माझ्या रक्तात नाही. मी पक्ष सोडणार नाही. पण पक्षाने मला सोडायचे का ते ठरवावे, असे आव्हान माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी गोपीनाथ गडावरुन भाजपला दिले. भाजपच्या कोअर कमेटीतूनही आज मी मुक्त होत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथगडावर राज्यभरातून मुंडे समर्थक मोठ्या संख्येने आले होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री प्रकाश मेहता, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर अशा ‘नाराजां’ची उपस्थिती लक्षवेधक ठरली. या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा यांनी अत्यंत आक्रमक शैलीत आपल्या भावना व्यक्त केल्या. पंकजा म्हणाल्या, समाजातील सर्व जातीधर्माच्या माणसांची स्वाभिमानी वज्रमूठ बांधण्यासाठी आता मी मुक्त झाले असून त्यासाठी लवकरच राज्यभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, रासपचे नेते महादेव जानकर, विधान सभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, व पाशा पटेल आदींची भाषणे झाली.
देवा, तू देखील जातीवादी आहेस का?
गोपीनाथ मुंडेंच्या पोटी जन्मलेली मी वाघीण आहे, असे लोक म्हणतात हे सांगतानाच पंकजा म्हणाल्या, ‘मुंडे साहेब स्वाभिमानी होते. त्यांनी कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. जनसंघाचा दिवा हाती घेऊन पक्षासाठी त्यांनी कार्य सुरू केले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी पक्ष वाढविला. माझ्या बाबानी पक्षासाठी संघर्ष केला. त्यांना केंद्रात मंत्रीपद देखील शेवटच्या क्षणी मिळाले. या मंत्रीपदाचा सत्कार, सन्मान घेण्याआधीच त्यांना जग सोडून जावे लागले. देवा, तू देखील जातीवादी आहेस का? ’
तेव्हाच सर्वकाही गमावले... आता काय गमावणार?
ज्या दिवशी माझे बाबा भरल्या ताटावरुन जग सोडून गेले, तेंव्हाच मी सर्व काही गमावले होते. त्यामुळे पराभवामुळे खचण्याचा अथवा गमावण्याचा प्रश्नच उरत नाही असू सांगून पंकजा म्हणाल्या, ‘आता त्यांच्या नावाने पदर पसरणार नाही. आपल्या ताकदीवर गोरगरिबांची सेवा करणार आहे. माझ्या तुमच्याकडून अपेक्षा नाही, तर नाराज कशी आणि कोणावर व्हायचे?’
स्मारकासाठी काही नको, मराठवाडा दुष्काळमुक्त करा
माझ्या बाबाच्या स्मारकासाठी तुम्ही काहीही देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावे घेऊन पंकजा यांनी केले. द्यायचेच असेल तर माझा मराठवाडा दुष्काळमुक्त करा, यासाठी मी २७ जानेवारी रोजी औरंगाबादेत लाक्षणणिक उपोषण करणार असल्याचेही
त्यांनी जाहीर केले.
त्या बातम्या कोणी पेरल्या?
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरले असतानाही शेवटच्या क्षणापर्यंत पक्षासाठी प्रचार केला. असे असताना मी बंड करणार, पक्ष सोडून जाणार अशा बातम्या कोणी पेरल्या? मी पक्ष सोडावा म्हणून तर हे सगळे प्रकार झाले नाहीत ना? याचाही पक्षाने शोध घेतला पाहिज,असे आवाहनही त्यांनी केले.
व्यक्तींकडून चुका झाल्या, पक्षावर राग का काढता?
व्यथा, दु:ख व्यक्त झाले पाहिजे. त्याची दखलही घेतली पाहिजे. चुका माणसाकडून झाल्या, त्याचा पक्षावर राग कशासाठी? बोलण्यातून एकमेकांना जखमा करू नका. घरातले भांडण घरातच मिटले पाहिजे, ते रस्त्यावर यायला नको, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीनाथगडावर गुरुवारी नाराज नेत्यांची समजूत घातली.