पीआय खाडेंनी घेतला ओळखीचा गैरफायदा, त्यांच्यासाठी लाच स्वीकारणारा तरुण करतो युपीएससी
By सोमनाथ खताळ | Published: May 20, 2024 11:49 AM2024-05-20T11:49:24+5:302024-05-20T11:49:58+5:30
सुभाष रोडवरील कपड्याच्या दुकानात जमा व्हायची लाच रक्कम, दुकानदार तरुणाचे शिक्षणही बुडाले
बीड : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने आपल्या फायद्यासाठी एका सुशिक्षित तरुणाचा बळी दिला आहे. गुन्ह्यातील आरोपी न करण्यासह आराेपींना सहकार्य करण्यासाठी खाडे हे लाचेची रक्कम सुभाष रोडवरील कुशल जैन या कपडा व्यापाऱ्याच्या दुकानात घ्यायचे. अनेक मांडवली देखील याच दुकानात झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु लाचेचा गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण घेणाऱ्या तरुण व्यापाऱ्याचे आयुष्य खराब झाले आहे. खाडे यांनी जैन यांच्यासोबत असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे.
जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे खाडे याने १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता ५ लाख रुपये घेताना कुशल जैन या खासगी व्यक्तीला पकडले होते. या प्रकरणात खाडेसह सहायक फौजदार आर. बी. जाधवर, कुशल जैन यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. बीडच्या एसीबीने खाडे आणि जाधवर यांच्या घराची झडती घेतली असता मोठे घबाड हाती लागले. खाडे याच्या घरात रोख १ कोटी ८ लाख रुपये, ९७ तोळे सोने आणि साडे पाच किलो चांदी असा मुद्देमाल सापडला. तर जाधवरच्या घरातही रोख रकमेसह २५ तोळे सोने सापडले. या दोघांकडेही एवढी मालमत्ता आली कुठून? याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे.
आता कशी नोकरी लागणार?
कुशल जैन हा दिल्लीला स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. काही दिवसांपूर्वीच तो बीडला आला होता. त्याच्या काही नातेवाईकांची आणि हरिभाऊ खाडे यांची ओळख होती. याचाच गैरफायदा घेत खाडे याने याच दुकानात लाच देण्याचे सांगितले. यामध्ये कुशल जैन हा तरुण अडकला. गुन्हा दाखल झाल्याने आता भविष्यात मोठा अधिकारी कसा होणार? असा प्रश्न आहे. खाडे यांच्यामुळे कुशलचे शैक्षणिक नुकसान झाल्याची चर्चा आहे. त्याला या लाचेच्या रक्कम बाबत फारशी काही माहिती नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. केवळ तक्रारदाराने दिलेले पैसे त्याने स्वीकारले, एवढाच रोल त्याचा असल्याचे समजते.
ठेवीदारांची एसीबी कार्यालयासमोर गर्दी
जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात बबन शिंदेसह अध्यक्ष, व्यवस्थापक आणि संचालक मंडळाविरोधात बीड शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बीड शहरासह जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे पैसे बुडवून शिंदे फरार आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. यातच बिल्डरला आरोपी न करण्यासाठी खाडे यांनी १ कोटी रुपयांची मागणी केली. हे समजताच गुरुवारी सकाळी आणि शुक्रवारीही काही ठेवीदारांनी एसीबी कार्यालयासमोर गर्दी केली. उपअधीक्षक शिंदे यांनी त्यांच्याशी संवादही साधला. त्यांना कारवाईची प्रक्रिया समजावून सांगितली. समाधान झाल्यानंतर ठेवीदार तेथून निघून गेले.