नजर अंदाज पाहणीत ५० टक्के नुकसान आढळल्यास २५ टक्के विमा अग्रीम.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:04+5:302021-08-23T04:36:04+5:30
बीड : जिल्ह्यात जुलैच्या मध्यानंतर पावसाने महिनाभर दडी मारली. त्यामुळे ऐन बहरात असलेल्या खरीप पिकांची वाढ खुंटली. यातून उत्पादन ...
बीड :
जिल्ह्यात जुलैच्या मध्यानंतर पावसाने महिनाभर दडी मारली. त्यामुळे ऐन बहरात असलेल्या खरीप पिकांची वाढ खुंटली. यातून उत्पादन क्षमतेवरही परिणाम झाला. आतापर्यंत पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनांची पडताळणी करून पीकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना द्यायचा किंवा नाही हे निश्चित केले जायचे. मात्र, आता पावसाचा मोठा खंड असेल आणि हंगाम कालावधी पूर्ण झाला नसेल, पण उत्पादन क्षमतेवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक परिणाम असल्यास नजर अंदाज पाहणी करून २५ टक्क्यांपर्यंत पीक विमा अग्रीम दिला जाणार आहे.
नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कृषी विभागाचा आढावा घेतला. यात महिनाभर पाऊस गायब झाल्याने पिकांची परिस्थिती असमाधानकारक असल्याची बाब समोर आली. त्यामुळे शासनाने पीक विमा कंपन्यांशी केलेल्या करारातील तरतुदीनुसार पावसाने महिनाभर दडी मारल्याने पिकांच्या उत्पादन क्षमतेत ५० टक्क्यांपर्यंत घट झालेली असेल तर संभाव्य नुकसान गृहीत धरून २५ टक्के पीक विमा अग्रीम शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात जुलैच्या पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पिकांची नजर अंदाज पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत.
पीक विम्याच्या बाबतीत पिकांचे नुकसान झाल्यानंतरही विम्याचे दावे निकाली काढण्यात मोठा विलंब लागतो. त्यामुळे एका हंगामी नुकसानीचा पैसा दुसरा हंगाम सुरू होईपर्यंतही शेतकऱ्यांच्या हातात पडत नाही, अशी परिस्थिती आहे. यावर आता जिल्हा प्रशासनाने विमा कायद्यातील तरतुदींचा आधार घेत शेतकऱ्यांना अग्रीम नुकसान भरपाई मिळवून देता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी यासंदर्भात ॲग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीला पत्र पाठवून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामध्ये २७ ते २८ दिवसांचा खंड पडल्याने मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांची नजरअंदाज पाहणी करावी आणि संभाव्य नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम द्यावी, असे निर्देश दिले आहेत.
....
पाच टक्के क्षेत्राची पाहणी करून बांधणार अंदाज
विमा कंपनीने आधी मूग, उडिदासाठी नजर अंदाज पाहणी करण्यास नकार दिला तर सोयाबीनची पाहणी करण्याची तयारी दर्शवली. असे असले तरी प्रशासनाने या तिन्ही पिकांसाठी पाच टक्के क्षेत्रावर नजर अंदाज पाहणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या पाच टक्के क्षेत्रावर नजर अंदाज पाहणी करून संभाव्य नुकसानीचे अंदाज बांधले जाणार आहेत. त्यासाठी पीक विमा कंपनीचे अधिकारी, कृषी सहाय्यक, मंडल अधिकारी व तलाठी यांच्या तालुकानिहाय समित्या गठीत केल्या आहेत. या समित्यांच्या अहवालावर २५ टक्के विमा अग्रीमचा निर्णय होईल.
....
पीक विम्यातील तरतुदीनुसार नैसर्गिक आपत्तीमुळे हंगाम पूर्ण होण्यापूर्वीच पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले असेल तर नजर अंदाज पाहणी करून २५ टक्के विमा अग्रीम तत्काळ मंजूर होते. अंतिम विमा रकमेतून अग्रीम रक्कम वजा करून उर्वरित लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. यंदा पावसाने महिनाभर दडी मारली. त्यामुळे नजर अंदाज पाहणी करून अहवाल तयार केला जाईल. मध्यम व हलक्या जमिनीवरील पिकांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झालेले असू शकते.
- दत्तात्रय मुळे, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, बीड