'एकही आरोपी सुटला तर, आम्ही टोकाचे पाऊल उचलणार', धनंजय देशमुखांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 20:24 IST2025-02-16T20:24:03+5:302025-02-16T20:24:20+5:30
'आरोपीला वाचविण्यासाठी कोणीही दगाफटका करू नये, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.'

'एकही आरोपी सुटला तर, आम्ही टोकाचे पाऊल उचलणार', धनंजय देशमुखांचा इशारा
केज(बीड)- मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्याचा गुन्हा गुन्हेगारांनी संघटित होऊन केलेला गुन्हा असल्यामुळे शासनाने या प्रकारणातील सर्व आरोपींना मकोका लावलेला आहे. सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी सुरू असतानाही जर एखादाही आरोपी सुटतो आहे, याची चाहूल लागताच देशमुख कुटुंबीय टोकाचे पाऊल उचलणार, असा इशारा धनंजय देशमुख यांनी पोलीस, तपास यंत्रणा व प्रशासनाला दिला आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अतिशय क्रूरपने संघटित होऊन गुन्हेगारांनी हा गुन्हा केलेला आहे. या प्रकारणाचे सर्व पुरावे पोलीस आणि तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. असे असताना याप्रकारणी कोणीही दगा फटका करू नये, ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीने आमच्या मनात कसलीही चलबिचल झालेली नाही. परंतु या प्रकारणात एखादा आरोपीला वाचविण्यासाठी कोणीही दगाफटका करू नये, ही आपली इच्छा असून सर्व आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, ही आमची प्रामाणिक मागणी असल्याचेही त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
तर देशमुख कुटुंबीय टोकाचे पाऊल उचलणार.?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे याच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे असतानाही तो तब्बल दोन वर्षे पोलिसांच्या नाकावर टीच्चून केजमध्ये उघडपणे फिरत होता. त्याला पोलिसांनी वेळीच आवर घातला असता, तर ही घटना घडलीच नसती. त्याला अभय देणारे कोण आहेत, हे तपास यंत्रनेला माहित आहे. असे असतानाही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारा कोणताही आरोपी सुटणार याची चाहूल लागताच देशमुख कुटुंबीय टोकाचे पाऊल उचलणार असल्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे.