पावसाचा अंदाज खोटा निघाल्यास हवामानशास्त्र विभागास कुलूप ठोकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:13 PM2018-05-18T17:13:00+5:302018-05-18T17:13:00+5:30
हवामान शास्त्र विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे मागीलवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणार आर्थिक नुकसान झाले होते, यावेळी तसे होऊ नये म्हणून भाई गंगांभीषण थावरे यांनी आज पुणे येथील भारतीय हवामान शास्त्र विभागास या बाबत निवेदन दिले.
माजलगाव (बीड ) : हवामान शास्त्र विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे मागीलवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणार आर्थिक नुकसान झाले होते. यावेळी असे होऊ नये, विभागाने पावसाचा अचूक अंदाज द्यावा म्हणून भाई गंगांभीषण थावरे यांनी आज पुणे येथील भारतीय हवामान शास्त्र विभागास या बाबत निवेदन दिले. गत वर्षी प्रमाणे हवामान खात्याचा अंदाज चुकी ठरून शेतकऱ्यांनानुकसान झाले तर १५ ऑगस्ट रोजी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरवर्षी हवामान खात्याच्या अंदाजावर हजारो शेतकरी महागामोलाचे बियाणे खरेदी करतात. मात्र पेरणीनंतर पाऊस न पडल्याने सर्व बियाणे जळून खाक होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान मागील वर्षात झाले. यामुळे माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्यात भाई गंगांभीषण थावरे यांनी हवामान खात्याच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचे सबब पुढे करत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.
यावर्षी हवामानाचा अंदाज खोटा ठरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची हवामान खात्याने काळजी घावी. योग्य माहितीद्वारे पावसाचा अचूक अंदाज वर्तवावा याबाबत थावरे यांनी आज पुणे येथील हवामान शास्त्र विभागात निवेदन दिले. जर हवामान अंदाज चुकीचे निघून शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर १५ ऑगस्ट रोजी पुण्याच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे दिला.