फेसबुकवरून पैशाची मागणी झाली, तर सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:26+5:302021-05-19T04:35:26+5:30
बीड : बनावट फेसबुक प्रोफाइल बनवून फ्रेंडस् यादीतील मित्र- मैत्रिणीला, तसेच नातेवाइकांना रिक्वेस्ट पाठवली जाते व त्यानंतर ...
बीड : बनावट फेसबुक प्रोफाइल बनवून फ्रेंडस् यादीतील मित्र- मैत्रिणीला, तसेच नातेवाइकांना रिक्वेस्ट पाठवली जाते व त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून अडचणीत असल्याचे सांगून पैसे मागितले जातात. त्याद्वारे अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. असे बनावट खाते उघडल्याचे लक्षात येताच सायबर सेलकडे तक्रार करावी जेणेकरून ते अकाउंट बंद करून पुढील कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली जाते, तसेच अशा प्रकारे पैशाची मागणी झाली, तर नागरिकांनी सावधानता बाळगावी.
आज बहुतांश जण अँड्रॉइड मोबाइलचा वापर करतात. त्याचसोबत मनोरंजन व संपर्कासाठी विविध माध्यमांचा वापरदेखील केला जाते, तसेच बँकिंगची अनेक कामेदेखील ऑनलाइन केले जात आहेत. यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, गुगल पे, फोन पे, ई-मेल यासह इतर माध्यमांचा सर्रास वापर केला जाते. मात्र, याच माध्यमांचा काही जण गैरफायदा घेत फसवणूक करतात. त्याचे धोकेदेखील वाढले असून, मित्र अडचणीत असल्याने अनेक जण मदत करण्याच्या उद्देशाने पैसेदेखील पाठवतात; परंतु पैसे न पाठवता थेट संबंधित मित्रास संपर्क करून त्याला अडचण आहे का? अशी विचारणा करावी, जेणेकरून फसवणूक होणार नाही. त्यानंतर संबंधित व्यक्तीने ‘सायबर सेल’ विभागात याप्रकरणी तक्रार केली, तर बनावट आकाउंट बंद केले जाते. त्यामुळे होणारी फसवणूक टाळता येते. नागरिकांनीदेखील सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जानेवारी ते मेपर्यंत सायबर पोलिसांकडे झालेल्या तक्रारी ८२
फेसबुकचे बनावत खाते उघडल्याच्या तक्रारी २३
बनावट फेसबुक खाते उघडून फसवणुकीचा प्रयत्न
एखाद्या व्यक्तीचे फेसबुक पेजवरील फोटो व संपूर्ण माहिती आहे तशी कॉपी करून बनावट फेसबूक पेज तयार केले जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या सर्व मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मैत्री झाल्यानंतर दोन किंवा १० दिवसांच्या फरकाने आजारी असल्याचे सांगून किंवा अडचण अल्याचे सांगत पैशाची मागणी केली जाते.
आपले बनावट फेसबुक खाते उघडण्यात आले आहे. त्यावरून पैशाची मागणी केली आहे. याची माहितीदेखील संबंधितास नसते. ज्यावेळी कोणीतरी संपर्क करतो त्यावेळी त्याच्या ही बाब लक्षात येते. त्यामुळे पैसे पाठविण्याऐवजी दक्षता घेणे व संपर्क साधणे गरजेचे आहे.
...अशी घ्यावी काळजी
ज्या मित्रांना बनावट फेसबुक अकाउंटवरून रिक्वेस्ट गेली आहे. त्याच्याकडून त्या अकाउंटची लिंक मागून घ्या. त्या प्रोफाइलवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा, तुमच्या नावासमोर फर्स्ट सपोर्ट किंवा रिपोर्ट प्रोफाइल हे ऑपरेशन दिसेल, त्यावर क्लिक करा, तसेच यासंदर्भात सायबर सेल विभागात तक्रार करा, तसेच आपल्या मुख्य खात्यावर अशासंदर्भात बनावट अकाउंट उघडून पैसे मागत असल्याचे जाहीर करावे, जेणेकरून मित्र जागरूक होतील व फसवणूक होणार नाही.
नागरिकांनी फेसबुकसंदर्भात पैशाची मागणी केल्यानंतर यासंदर्भात माहिती घेतली पाहिजे, तसेच ऑनलाइन गुन्हे टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करू नये, हनीट्रॅपचेदेखील प्रकार वाढले आहेत. बँक खात्यासंदर्भात माहिती देणे टाळावे. ‘फोन पे’, ‘गुगल पे’ केअर नंबर खरा आहे का, याची खात्री करावी, तसेच संशय आल्यास सायबर सेलकडे तक्रार करावी.
-आर.एस. गायकवाड,
सायबर सेल प्रमुख, बीड