रुग्णसंख्या वाढत असल्यास प्रशासनाने कडक निर्बंध घालावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:00+5:302021-06-19T04:23:00+5:30
बीड : राज्यात कोरोनाची दुसऱी लाट नियंत्रणात येत असतानाच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले आहे. हे ...
बीड : राज्यात कोरोनाची दुसऱी लाट नियंत्रणात येत असतानाच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण चिंताजनक आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यास प्रशासनाने कडक निर्बंध घालावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.
कोरोना आणि खरीप हंगाम या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. वाढत्या रुग्णसंख्येविषयी पवार यांनी यावेळी चिंता व्यक्त करत यंत्रणेवर नाराजीदेखील व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. संजय दौंड, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, उपायुक्त अविनाश पाठक, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. औषधे, आरोग्य सुविधा वाढविताना लसीकरण गतीने होण्याच्या दृष्टीनेदेखील यावेळी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १४ केएल क्षमतेचा एक लिक्विड ऑक्सिजन टॅंक उपलब्ध करून लिक्विड ऑक्सिजन साठा सुरक्षित करावा, असे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. बैठकीदरम्यान रुग्णवाहिका मागणीचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी तसेच म्युकरमायकोसिस आजारावरील यंत्रणा उपलब्ध करून घेण्यातील अडचणी सोडविण्यासाठी अजित पवार यांनी राज्याचे आरोग्य आयुक्त रामस्वामी यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करून सूचना दिल्या. यावेळी रुग्णवाहिका खरेदीसाठी तांत्रिक मान्यतेचा अधिकार जिल्हा स्तरावर देण्याचा निर्णय आजच्या आज आरोग्य विभागाने करावा, असे निर्देशदेखील यावेळी दिले.
कर्ज वाटपासाठी बँकांना १५ जुलै अंतिम मुदत
खरीप हंगामाच्या दृष्टीने यावेळी त्यांनी आढावा घेतला. यावेळी पीक कर्ज वाटपासाठी बँकांना १५ जुलै ही अंतिम मुदत देण्यात येत आहे, असे पवार म्हणाले. कर्ज वाटप करण्याचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे व जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला त्याचा आढावा घ्यावा, अशा सूचनादेखील पवार यांनी दिल्या.
नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी
बीड शहरातील अस्वच्छता पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच संतापले. यांनी बैठकीदरम्यान बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना धारेवर धरत शहर दोन दिवसात स्वच्छ करण्याचे आदेश दिले. स्वच्छ न झाल्यास कारवाई करण्याची तंबीदेखील यावेळी पवार यांनी दिली.
===Photopath===
180621\18_2_bed_18_18062021_14.jpeg
===Caption===
बीड येथील आढाव बैठकीत सूचना देताना उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे आदी.