कोरोना चाचणी न करता दुकाने चालू असल्यास गुन्हा दाखल करून सील करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:24+5:302021-03-20T04:32:24+5:30
बीड : सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या व्यावसायिकांनी कोरोना तपासणी न करता दुकाने चालू ठेवली असल्यास गुन्हे दाखल करून ती दुकाने ...
बीड : सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या व्यावसायिकांनी कोरोना तपासणी न करता दुकाने चालू ठेवली असल्यास गुन्हे दाखल करून ती दुकाने सील करावीत.
जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये यासाठी नगर परिषद, महसूल, ग्रामविकास आणि पोलीस विभागाने तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ. सूर्यकांत गिते यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाबत सद्य:स्थितीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी जगताप म्हणाले की, कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर बंधनकारक असून, यासह सूचना दिलेल्या नियमांचे पालन केले जाणे आवश्यक आहे.
यावेळी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पातळीवर उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेणे, नियम भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, आरटीपीसीआर तपासण्या वाढवणे आदी सूचना त्यांनी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी कोरोना तपासण्या वाढविण्यासाठी परळी, बीड, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई या शहरांतील दहा खाजगी रुग्णालयांमध्ये नागरिकांच्या कोरोना आरटीपीसीआर तपासणीस परवानगी देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, असे सांगितले.
पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी निर्बंधासाठी महसूल आणि आरोग्य यंत्रणांशी पोलीस विभागाकडून समन्वयाने काम केले जाईल, असे सांगितले.
लॉकडाऊनची वेळ आणू नका
कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या गतीने वाढत असून, लगतच्या जिल्ह्यांमध्ये या अनुषंगाने निर्बंध कडक केले जात आहेत, जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरांमध्ये नागरिक काळजी घेताना दिसत नाहीत. लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी अति सावधानता गरजेची असून, शासकीय यंत्रणांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना, दुकाने, व्यावसायिक, नागरिकांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बैठकीत दिले.
------
चार दुकाने सील गुन्हे दाखल
अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी पाटोदा, आष्टी येथे भेट देऊन संबंधित यंत्रणांसह प्रत्यक्ष पाहणीची माहिती दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गीते आणि निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी जिल्ह्यातील सध्याच्या स्थितीबद्दल माहिती सादर केली. शिरूर येथे २, यासह पाटोदा व आष्टी येथे दुकाने सील करून गुन्हे दाखल करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
===Photopath===
190321\19bed_5_19032021_14.jpg
===Caption===
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कोरोनाबाबत आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या. त्यावेळी सीईओ अजित कुंभार, एस. पी. आर. राजा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, आरडीसी संतोष राऊत आदी