आई-वडिलांना सांभाळत नसाल तर मग नातेसंबंध प्रमाणपत्र मिळणार नाही; ग्रामसभेत ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 02:14 PM2023-12-16T14:14:10+5:302023-12-16T14:14:34+5:30
नातेसंबंध प्रमाणपत्र न देण्याचा आसारडोह ग्रामसभेत एकमूखी ठराव
धारूर : गावातील जो कोणी आई-वडिलांचा सांभाळ करणार नाही त्याला ग्रामपंचायतीकडून नातेसंबंध प्रमाणपत्र मिळणार नाही, असा ठराव धारूर तालुक्यातील आसारडोह ग्रामसभेत गुरुवारी झाला. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
धारूर तालूक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या आसरडोह येथील गावातील ग्रामसभामध्ये हा ठराव घेण्यात आला.आई- वडिलांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे, या उद्देशाने हा ठराव घेतला गेला. ग्रामसभेत माजी चेअरमन विष्णू शिंदे यांनी सुचविले की, गावातील जे कोणी व्यक्ती आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांना नातेसंबंध प्रमाणपत्र देऊ नये. जेणेकरून न्यायालय त्यांना वारस प्रमाणपत्र देणार नाही. या ठरावाला रवी देशमुख यांनी अनुमोदन दिले.
हा महत्वपुर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाची कठोरपणे अमलबंजावणी करण्याचा निर्धार करण्यात आला. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंगल आबासाहेब देशमुख होत्या. ठरावाचे वाचन ग्रामसेवक आर.डी.पाठक यांनी केले.