‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’ - A - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:42+5:302021-08-24T04:37:42+5:30

घाटनांदूर : गाव करील ते राव काय करील? असे म्हटले जाते. मात्र, घाटनांदूर येथे नेमके उलटे घडले असून, ते ...

‘If there is a cemetery, it is like Ghatnandur’ - A - A - A | ‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’ - A - A - A

‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’ - A - A - A

Next

घाटनांदूर : गाव करील ते राव काय करील? असे म्हटले जाते. मात्र, घाटनांदूर येथे नेमके उलटे घडले असून, ते केवळ एका व्यक्तीमुळे. माजी सैनिक बन्सीसाहेब जाधव यांच्या पुढाकारातून येथील स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. पूर्वी अंत्यविधीवेळी बाहेरगावचे नाक मुरडणारे पाहुणे आज ‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’ असे म्हणताना दिसत आहेत. प्रेक्षणीय स्थळ वाटावे इतपत स्मशानभूमीची सुधारणा करण्यात आली.

निजामकालीन जहागिरीचे गाव असलेल्या घाटनांदूर येथे मराठा समाज (पाटील, देशमुख) मोठ्या प्रमाणात आहे. पारंपरिक स्मशानभूमी गावातील रेल्वे गेटजवळ भदाडा आंबा नामक जागेत होती. सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. जायला धड रस्ता नव्हता. पावसाळ्यात खांदेकऱ्यांना त्रास व्हायचा. एक पाय रोवला की दुसरा काढायचा, अशी बिकट अवस्था. रेल्वे पटरीने जावे तर रेल्वे, मालवाहतूक करणाऱ्या वॅगन कधी येतील याचा नेम नसे. अंत्यविधीला पाहुणा येणेही कठीण बनले होते. हे सर्व पाहून प्रा. सुरेश जाधव यांनी तपेश्वर मठ संस्थानजवळ झोपडपट्टी भागातील स्वतःची वीटभट्टीची जागा पाण्याच्या हौदासह स्मशानभूमीसाठी दिली. समाजाच्या निधीतून गेट बसविले आणि मृत्यूनंतर होणारी फरफट थांबली; पण कुंपण, सुशोभिकरण, विकासाचे काय? वेळ कोणी द्यायचा? या घोळात अनेक वर्षे गेली. अखेर माजी सैनिक तथा लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे चेअरमन बन्सीसाहेब जाधव यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सुरुवातीला स्वत: खर्च करत सुधारणेसाठी पुढाकार घेतला. माजी सरपंच ज्ञानोबा जाधव यांच्या सहकार्यातून रहिवाशांना विश्वासात घेत काटेरी कुंपण पूर्ण केले. साधे शेड असलेल्या स्मशानभूमीत चोहोबाजूने पत्रे वाढविले. सरण रचण्याआधी मृतदेह (तिरडी) ठेवण्यासाठी मोठा ओटा केला. तब्बल साठ टिप्पर काळी माती चोहोबाजूने टाकून वड, पिंपळ, लिंब, चंदन आदींसह शोभेची फुलझाडे लावली. यात प्रामुख्याने २४ तास ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा भरणा अधिक आहे. कचखडी टाकून बाजूने विटा लावून रस्ता तयार केला. पितृपक्षात महत्त्वाच्या असलेल्या मोहाच्या झाडांची जवळपास ३० रोपे लावली. तुळशीपत्र, मंजुळांशिवाय अंत्यविधी होत नाही, याची जाणीव ठेवत तुळशीबन तयार केले आहे. अस्थिकलशासाठी लॉकर, अंत्यविधीसाठी आलेल्यांना विश्रांतीसाठी सिमेंटचे बाक आहेत. संपूर्ण झाडांना नियमित पाणी मिळावे म्हणून सर्वत्रच ठिबक बसविले. रोपट्यांची आता दहा ते बारा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. बन्सी जाधव स्वतः दररोज सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारून देखभाल करतात. त्यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आदर्शवत असे वैकुंठधाम प्रत्यक्षात साकारले आहे.

मृत्यू हेच अंतिम सत्य

जन्मानंतर मृत्यू हेच आयुष्याचे अंतिम सत्य असून, जन्माचा उत्सव करतो, तसेच अंतिम ध्येय साध्य झाल्यास त्याचाही उत्सव व्हायला पाहिजे. सर्वांना प्रसन्न वाटावे, यादृष्टीने स्मशानभूमीची सुधारणा करण्याचे ध्येय मी अंगिकारले. यात समाजबांधव यथाशक्ती सहकार्य करीत असल्याचे सेवानिवृत्त सैनिक बन्सी जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: ‘If there is a cemetery, it is like Ghatnandur’ - A - A - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.