या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 03:39 AM2024-10-13T03:39:16+5:302024-10-13T03:39:52+5:30
धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला साथ देण्याचे काम केले.
बीड : शेतकऱ्यांना अनुदान नाही, पीकविमा नाही, मराठा, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण मिळत नाही. कैकाडी, महादेव कोळी, गरिबांना काही दिले जात नाही, बंजारा समाजाला प्रवर्ग दिला जात नाही, आचारसंहिता लागायच्या आत जनतेच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, असे आव्हान देत मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी ‘ए सरकार म्हणत दंड थोपटले. या राज्यासाठी झिजणाऱ्या समाजाचा खुन्नस ठेवून, डोळ्यात चटणी टाकून अपमान केला तर उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत आपली भूमिका आचारसंहितेनंतर स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला साथ देण्याचे काम केले.
समाजाच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाही
अन्यायाविरुद्ध उठाव करावा लागतो. अडवणूक आणि अन्याय होणार असेल तर उठाव करावाच लागणार, असे सांगत जरांगे म्हणाले, समाजाचे दारिद्र्य कमी व्हावे म्हणून संघर्ष केला. मी व माझ्या समाजाने असे कोणते पाप केले? शेतकरी, समाजाने काय केलं? हे कोणी सांगेल का? समाजाच्या डोळ्यातील पाणी बघवत नाही.
कोणावर अन्याय करायचा नाही, पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करावेच लागेल. या राज्यात न्यायासाठी आंदोलन सुरू आहे. १४ महिन्यांपासून गरिबांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून माझ्यासारखा गरीब झुंजतोय. तुमची लेकरं माेठी व्हावीत, यासाठी एकजुटीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तुमच्या डोक्यावर गुलाल टाका, दुसऱ्यावर गुलाल टाकायच्या नादात कलंक लागू देऊ नका, समाजाची शान, शक्ती आणि बळ वाढवा, असेही ते म्हणाले.
आता धक्का लागत नाही का?
- आम्ही आरक्षण मागत होतो, तेव्हा धक्का लागत असल्याचे सांगितले जात होते. तुमच्या मागण्या महाविकास आघाडीकडून लिहून घ्या म्हणायचे. आता आरक्षणात १७ जाती घातल्या आहेत.
- मग या काय त्यांच्याकडून लिहून घेतल्या का? आता आरक्षणाला धक्का लागत नाही का? गरीब, ओबीसींचा विचार का केला नाही? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. सरकारने हा निर्णय खुन्नस ठेवून केल्याचे सांगत अन्याय करणार असेल तर समोरच्यांना उखडून फेकावे लागेल, असे जरांगे यावेळी म्हणाले.