बाहेरगावी जाताय, तर पोलिसांना माहिती द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:58 PM2019-03-10T23:58:06+5:302019-03-10T23:58:10+5:30
चोरी, घरफोडी टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन बीड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कामानिमित्त किंवा काही कारणास्तव जास्त दिवस घर बंद करून कोठे जात असाल, तर याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्या. यामुळे पोलीस तुमच्या घराकडे गस्त वाढवतील. एवढेच नव्हे तर नातेवाईक किंवा विश्वासू शेजाऱ्यांनाही माहिती देऊन काळजी घ्यावी. चोरी, घरफोडी टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन बीड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांनाही सूचना केल्या आहेत.
गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे आणि बीड शहरातील काही चोरी, घरफोडीच्या घटना डोळ्यासमोर ठेवून बीड पोलिसांनी नागरिकांना काळजी घेण्यासंदर्भात काही सूचना करून आवाहन केले आहे. तसेच पोलिसांकडूनही उपाययोजना केल्या आहेत. कामानिमित्त किंवा काही कारणास्तव नागरिक अनेक दिवस घर बंद करून बाहेरगावी जातात. हीच संधी साधून चोरटे हात साफ करून घेत हजारो, लाखोंचा किमती मुद्देमाल घेऊन पसार होतात. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस काही नागरिक गरमीमुळे छतावर, घरासमोरील पटांगणात अथवा इतरत्र कोठेतरी झोपतात. यावेळी घराकडे थोडे दुर्लक्ष होते. याचाच फायदा घेत चोरी, घरफोडी सारखे गुन्हे करण्यात चोरटे यशस्वी होतात. हे टाळण्यासाठी आणि गुन्हेगारी बंद करण्यासाठी नागरिकांनीच आता सतर्क राहणे गरजेचे आहे. जास्त दिवस बाहेरगावी जात असल्यास जवळचे पोलीस ठाणे, चौकी किंवा नातेवाईक, शेजारच्यांना माहिती द्यावी. यामुळे पोलीसही गस्त वाढवतील आणि जवळचे लोकही घराकडे लक्ष देतील. यामुळे चोरी सारखे गुन्हे टळतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अडचण वाटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी केले आहे.
पोलीस डायरीत होणार नोंद
जे लोक घर बंद करून बाहेर जाणार आहेत, त्यांची पोलीस डायरीत नोंद केली जाणार आहे. या परिसरात पोलीस गस्त वाढवतील. तसेच नागरिकांनीही परत आल्यावर पोलिसांना माहिती देणे बंधनकारक राहील. याबाबत ठाणे प्रमुखांना आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सूचना केल्या आहेत.