कामचुकारपणा केल्यास गय करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:55+5:302021-05-05T04:55:55+5:30
अंबाजोगाई : रुग्णसेवेचे काम करताना उदात्त हेतू बाळगून मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करा. या कामात जे कामचुकारपणा करतील त्यांची गय ...
अंबाजोगाई : रुग्णसेवेचे काम करताना उदात्त हेतू बाळगून मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करा. या कामात जे कामचुकारपणा करतील त्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी दुपारी लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटर व अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते, अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर,स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे,उपजिल्हाधिकारी शरद झाडके,तहसीलदार विपिन पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी केंद्रेकर यांनी दोन्ही ठिकाणच्या रुग्णसेवेचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी विचारून घेतल्या.
स्वाराती रुग्णालयातील नवीन ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना आखल्या. तसेच रुग्णसेवा देताना डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी,इंजेक्शन व औषधांचा तुटवडा ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. रुग्णसेवा देताना जे लोक चांगले काम करत आहेत, त्यांचे त्यांनी स्वागत केले. तर कामचुकारपणा करणाऱ्यांची गय करणार नसल्याची तंबीही त्यांनी दिली.
एक कुटुंब प्रमुख म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे. रुग्णसेवेत कसल्याही अडचणी अथवा अडथळे येऊ देणार नाही. तुम्ही तुमचे काम मानवतेचा दृष्टिकोन ठेवून उदात्त हेतूने करा. ही कोरोनाची लढाई आपल्याला सेवेच्या माध्यमातून जिंकायची आहे. यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. असे आवाहन त्यांनी केले.
===Photopath===
040521\avinash mudegaonkar_img-20210504-wa0082_14.jpg