राजकारण करायचे नव्हते तर रिपोर्ट तयार नसताना गुन्हा दाखल करण्याची घाई का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:01 AM2017-12-12T01:01:01+5:302017-12-12T01:01:08+5:30
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे नव्हते तर घटनेचा कोणताही रिपोर्ट आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? असा सवाल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे नव्हते तर घटनेचा कोणताही रिपोर्ट आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? असा सवाल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी केला आहे. घटनास्थळावर जाण्यास मनाई केल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ८ डिसेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत बारा कर्मचारी जखमी झाले, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. दोन वर्षाच्या संघषार्नंतर कारखान्याची परिस्थिती पुर्ववत चागली झाली असताना नेमके मुंडे साहेबांच्या जयंतीच्या अगोदर झालेली दुर्घटना हादरून टाकणारी व विचारात पाडणारी आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
या घटनेनंतर जखमींना योग्य उपचार देणं, कारखान्यातील यंत्रणेला मनोबल देणं हे प्रथम कर्तव्य असतं, जे आम्ही व आमच्या संचालकांनी चोखपणे बजावण्याचा प्रयत्न केला, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. याउलट घटना घडल्यानंतर जखमींना मदत करायची सोडून काहींनी कारखान्याचे घटनास्थळ गाठून, फोटो काढून स्वत:च्या शाबासकीच्या बातम्या स्वत:च देणं आणि कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे त्यांनी केलेले स्टेटमेंट राजकारणाने बरबटलेलं होते असा टोलाही पंकजा यांनी लगावला.
घटनास्थळ सील
तपासात अडचणी येऊ नये, यासाठी घटनास्थळ सील केलेले होते. याठिकाणी कोणालाही जाऊ देऊ नये, असे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले होते. यामध्ये कोणाचेही वैयक्तिक नाव नव्हते. त्यामुळे आपल्याला रोखण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे आहे, रोखणाºया पोलीस अधिका-यांना अधिवेशनात बघून घेऊ, अशी अशोभनीय भाषा करून पदाचा गैरवापर करणा-या विरोधी पक्षनेत्यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित होते.
- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री