ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:06+5:302021-09-08T04:40:06+5:30
बीड : कोरोनापासून बचावासाठी लस घेणे गरजेचे आहे. ही लस सुरक्षित असून, लाभदायकही असल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. तरीही ...
बीड : कोरोनापासून बचावासाठी लस घेणे गरजेचे आहे. ही लस सुरक्षित असून, लाभदायकही असल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. तरीही काही लोकांमध्ये याबद्दल गैरसमज कायम आहेत. लस घेतल्यावर ताप न आल्यास ती खोटी असल्याची चर्चा केली जात आहे; परंतु प्रत्येकालाच त्रास होतो, असे मुळीच नसून याचे प्रमाण केवळ ५ ते १० टक्के असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. सर्वांनी लस घेण्याचे आवाहनही केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ६० हजार लोकांनी कोरोना लस घेतली आहे. ज्यांनी लस घेतली त्यांचे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अतिशय किरकोळ आहे. आरोग्य विभागाने याबाबत वारंवार पत्रके काढून जनजागृतीही केली आहे, तसेच लस घेण्याबाबत आवाहनही केले जात आहे; परंतु लस घेतल्यानंतर काही लोकांचा त्रास होतो आणि काहींना होत नाही. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. ज्यांना त्रास होत नाही, त्यांच्याकडून लस खोटी आहे, अशी अफवा पसरवली जात आहे; परंतु आरोग्य विभागाने याबाबत खुलासा केला असून, लस सुरक्षित आणि खरीच आहे. लस घेतल्यानंतर त्रास होण्याचे प्रमाण केवळ १० टक्के आहे. शरीरातील अँटिबॉडीजवर हे सर्व अवलंबून असल्याचे सांगण्यात आले. सर्वांनी लस घेऊन कोरोनापासून बचाव करावा, असे आवाहनही करण्यात आले.
--
कोविशिल्डचा त्रास अधिक
जिल्ह्यातील नागरिकांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन, अशा दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत; परंतु कोविशिल्डचा त्रास झालेल्या लोकांची संख्या अधिक आहे. मात्र, हा त्रास काही तासांपुरताच असतो. पॅरासिटाॅमल, डोलो ६५० हे औषधी सेवन केल्यानंतर होणारा त्रास कमी झाला आहे. जर त्रास झाला तर तात्काळ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
---
कोरोना लस सुरक्षित आणि खरीच आहे. लस घेतल्यानंतर त्रास होणाऱ्यांचे प्रमाण १० टक्केच आहे. नागरिकांनी मनातील गैरसमज दूर करून अफवांवर विश्वास ठेवू नये. लस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी. गैरसमज असतील तर जवळच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून त्याची खात्री करावी.
-डॉ. एल.आर. तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा
--
पहिला डोस - ७७०६०६
दुसरा डोस - २९००२३
--
कोविशिल्ड ९१४६१६
कोव्हॅक्सिन १४६०१३
070921\07_2_bed_8_07092021_14.jpg
डॉ.एल.आर.तांदळे,