लग्न कर नाही तर पळवून नेईन; त्रासास कंटाळलेल्या तरुणीनी उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:37 PM2022-12-10T18:37:40+5:302022-12-10T18:39:12+5:30
ओळखीतून तो तिच्याकडे सतत लग्नाची मागणी करत होता.
बीड : नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नासाठी एका तरुणाने तगादा लावला, त्याच्या तगाद्याला कंटाळून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना ७ डिसेंबरला शहराजवळील समनापूर शिवारात उघडकीस आली. याबाबत तरुणासह त्याच्या मित्रावर गुन्हा नोंद झाला, त्यानंतर दोघांना अटक केली. सुमित्रा राजू ईटकर (२२,रा.हिरापूर ता.गेवराई, हमु.बीड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. किशोर कचरू साठे (रा.गौतम बुध्द कॉलनी, बीड) व सम्यक संजय पारवे (रा.राजीव गांधी चौक, बिंदुसरा कॉलनी, हमु.मित्रनगर, बीड) यांचा आरोपींत समावेश आहे. सुमित्रा
ही बीएस्स्सी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. तीन वर्षांपासून तिची किशोर साठेशी ओळख होती.या ओळखीतून तो तिच्याकडे सतत लग्नाची मागणी करत होता. मात्र, लग्नास घरातून विरोध होता. माझ्याशी लग्न कर अन्यथा तुला पळवून नेईन व जीवे मारून टाकीन, अशी धमकी किशोर साठे देत असे. त्याचा मित्र सम्यक पारवे यानेही किशोरशी लग्न करण्याकरता तिच्यामागे तगादा लावला होता. त्या दोघांच्या जाचास कंटाळून सुमित्राने समनापूर शिवारात जाऊन ७ रोजी एका विहिरीत उडी घेतली. तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला. मयत सुमित्राची बहीण संगीता सोन्याबापू लष्करे (रा.हिरापूर ता.गेवराई हमु. वंजारवाडी ता.गेवराई) यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण ठाण्यात किशोर साठे व सम्यक पारवे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास उपनिरीक्षक देवीदास आवारे करत आहेत.
पाच दिवसांची पोलिस कोठडी
७ डिसेंबरला रात्रीच दोन्ही आरोपींना ताब्यात घेेतले. ८ रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. घटनास्थळी उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि.संतोष साबळे, उपनिरीक्षक देवीदास आवारे, हवालदार पी.टी.चव्हाण, आनंद मस्के व रवी झुनगुरे यांनी भेट दिली.