राहायचं असेल तर मुंडेंसोबत, अन्यथा गरज नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मेटेंचा समाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:19 PM2019-04-13T13:19:45+5:302019-04-13T13:20:15+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाजोगाईच्या सभेत आ. विनायक मेटेंचा समाचार घेतला.
अंबाजोगाई (बीड ) : कोणी जर राज्यात भाजपासोबत व बीड जिल्ह्यात वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये. भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सोबत राहायचं असेल तर मुंडेंसोबत अन्यथा गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाजोगाईच्या सभेत आ. विनायक मेटेंचा समाचार घेतला.
बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह नेते उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. ते म्हणाले, अपघातापेक्षा यू टर्न घेत जे निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतात त्या शरद पवारांना आता पक्षाकडे कोणतंच काम राहिले नसल्याने ही निवडणूक जातीकडे नेत आहेत. अशा भूलथापांना लोक थारा देत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. जातीधर्माच्या नव्हे तर विकासावर मत मागा असा सल्लाही त्यांनी दिला. ज्यांना पंधरा वर्ष सत्तेत असूनही मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. त्यांना आपण स्वत: आरक्षण दिले. बीड जिल्ह्यात १५ वर्षात केवळ ४०० कोटी रुपये आघाडी सरकारने दिले होते. तर माझ्या चार वर्षाच्या कार्यकाळत ३७०० कोटी रुपये देण्यात आले.
मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करू
मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली देश स्वाभिमानाने उभा आहे. आजपर्यंत ताठ कणा असणारा पंतप्रधान नव्हता. जशास तसे ठोस उत्तर देऊन पाकिस्तानला नमविण्याची कामगिरी त्यांनी केली. मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित असून सामान्य माणूस विकासाच्या प्रवाहात आल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला गोपीनाथराव मुंडे यांनी नवी दिशा दिली. त्यांचा वारसा पंकजा व प्रीतम समर्थपणे चालवत आहेत. गोपीनाथरावाचं नाव लावण्याचा खरा अधिकार या दोघींनाच आहे. विनाकारण त्यांचं नाव लावण्यावरून राजकारण सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाडयाचा दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी स्वतंत्र वॉटरग्रीड तयार करून गोदावरीचे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला मिळवून देण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.