अवैध वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:50 AM2021-02-23T04:50:24+5:302021-02-23T04:50:24+5:30
पाटोदा : तालुक्यातील डोंगरकिन्ही, अंमळनेर, वैद्यकिन्ही, निरगुडी, नायगाव या परिसरात सर्रासपणे अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसत आहे. वनविभागाकडून ...
पाटोदा : तालुक्यातील डोंगरकिन्ही, अंमळनेर, वैद्यकिन्ही, निरगुडी, नायगाव या परिसरात सर्रासपणे अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसत आहे. वनविभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वृक्षमित्रांमधून केला जात आहे. वृक्षतोड थांबविण्याची मागणी नागरिक आणि वृक्षप्रेमींमधून होत आहे.
रिक्षातून अवैध वाहतूक जोमात सुरू
वडवणी : बीड, वडवणी, तेलगाव या महामार्गावर रिक्षा, जीपमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक शाखेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
स्वच्छतेअभावी नाल्या तुंबल्याने दुर्गंधी
बीड : शहरातील अनेक भागांत नाल्या तुंबलेल्या आढळून येत आहेत. नगरपालिकेकडून वेळेवर स्वच्छता होत नसल्याने, या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच अनेक भागांत डासांचा त्रास वाढला आहे. येथे स्वच्छता मोहीम राबवावी आणि घाण दूर करावी, अशी मागणी रहिवाशांमधून होत आहे.
कार्यालयांना घाणीचा विळखा
पाटोदा : शहरातील बस स्थानकासह शासकीय कार्यालयांच्या इमारतींना घाणीचा विळखा पडला आहे. विविध कामांसाठी येणारे नागरिक, तसेच येथील कर्मचाऱ्यांना या घाणीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देत, परिसर स्वच्छ करण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
रुग्णालयाभोवती घाण
गेवराई : शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसराभोवती घाण साचली आहे. यामुळे दुर्गंधी सुटली असून, रुग्ण व नातेवाइकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. परिसरात कचरा टाकू नये, असे वारंवार सांगण्यात येऊनही त्याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाइकांकडून होत आहे.