शिवीगाळप्रकरणी एसीएस विरोधातील तक्रारीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:47+5:302021-01-02T04:27:47+5:30
बीड : अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी भूलतज्ज्ञ डॉ. सय्यद शाफे यांना कक्षात बोलावून घेत शिवीगाळ केली ...
बीड : अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी भूलतज्ज्ञ डॉ. सय्यद शाफे यांना कक्षात बोलावून घेत शिवीगाळ केली होती. यात तक्रार करूनही अद्याप त्यावर साधी चौकशी समितीही नियुक्त केलेली नाही. याबाबत आपण उपसंचालकांकडून मार्गदर्शन घेणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते म्हणाले. चार दिवस उलटूनही काहीच न केल्याने यात दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भूलतज्ज्ञ डॉ. शाफे यांची मंगळवारी सकाळी ऑन काॅल ड्यूटी होती. याचवेळी डॉ. राठोड यांनी त्यांना संपर्क करून काेठे आहेस रे तू, अशी अरेरावी केली. त्यानंतर डॉ. शाफे त्यांना जाऊन भेटले असता त्यांनी शिवीगाळ केली. याबाबत डॉ. शाफे यांनी तात्काळ डॉ. राठोडविरोधात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गित्ते यांच्याकडे तक्रार केली. या घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप काहीच हालचाली केल्या नसल्याचे दिसत आहे. यावरून डॉ. राठोड यांना वरिष्ठांकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. चौकशी कोणी करायची, याबाबत उपसंचालकांना पत्र देऊन मार्गदर्शन घेणार असल्याचे डॉ. गित्ते यांच्याकडून सांगितले जात आहे. मार्गदर्शनच मागवायचे होते तर चार दिवस उशीर का केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोट
डॉ. राठोड यांची चौकशी करण्यासाठी उपसंचालकांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले जाणार आहे. अद्याप पत्र पाठविले नाही.
-डॉ. सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्यचिकित्सक, बीड