बीड अवैध गर्भपात प्रकरण; लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबादेतून बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 03:20 PM2022-06-12T15:20:39+5:302022-06-12T15:46:39+5:30

अवैध गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू; या प्रकरणात नर्सची आत्महत्या, अंगणवाडी सेविका अटकेत तर डॉक्टर फरार होता

Illegal abortion case in Beed; Handcuffed doctor from Aurangabad who detect gender | बीड अवैध गर्भपात प्रकरण; लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबादेतून बेड्या

बीड अवैध गर्भपात प्रकरण; लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबादेतून बेड्या

googlenewsNext

-सोमनाथ खताळ

बीड : अवैध गर्भपात प्रकरणातील आतापर्यंतची मुख्य आरोपी असलेली मनिषा सानप ही अंगणवाडी सेविका कारागृहात आहे. गर्भपात करणारी सीमा डोंगरे हिने आत्महत्या केली. तर मुख्य आरोपी म्हणजे गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर फरार होता. त्याच्या औरंगाबादेतून मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. याबाबत पोलिसांनी अद्यापही अधिकृत जाहिर केले नसले तरी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे याप्रकरणाची माहिती देणार असल्याचे समजते.

शीतल गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान ५ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात पिंपळनेचे उपनिरीक्षक एम.एन. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबुराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यातील सीमा हिने पाली येथील तलावात आत्महत्या केली. इतर पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मनीषा कारागृहात आहे, तर इतरांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांची तपासाची गती संथ आहे. त्यांच्या तपासाबद्दल आणि भूमिकेबद्दल कायम संशय व्यक्त केला जात होता. कसलेही प्रमाणपत्र सादर न करताच तपास अधिकाऱ्यांनी मनिषाची मानसिकता ठिक नसल्याचा बहाणा दाखवून तिला न्यायालयीन कोठडीत पाठविले. तसेच लॅबवाला आणि नातेवाईकांना पोलीस कोठडी घेतली असली तरी त्यांच्याकडूनही धागेदोरे हाती लागत नव्हते. ज्या संशयित डॉक्टरने मनिषाच्या घरी येऊन शीतलचे गर्भलिंग निदान केले, त्याचाही शोध लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. अखेर यातील मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. तो एमबीबीएसचे शिक्षण घेत होता की नापास झालेला आहे, याची माहिती सायंकाळीच समजणार आहे. आता या डॉक्टरपासूनही आरोपींची साखळी आणखी वाढू शकते.

Web Title: Illegal abortion case in Beed; Handcuffed doctor from Aurangabad who detect gender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.