अंबाजोगाईत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी वाटली खिरापत; ११ हेक्टर जमिनीवर केला बेकायदेशीर फेरफार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 06:33 PM2020-09-12T18:33:41+5:302020-09-12T18:36:25+5:30
बेकायदेशीर कारभारामुळे तलाठी व मंडळाधिकारी दीड महिन्यापूर्वी निलंबित झाले.
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सर्व्हे नंबर ५९२ मधील ११ हेक्टर २२ आर शेतजमीन शासकीय मालकीची असताना तलाठी व मंडळअधिकारी यांनी संगनमत करून बेकायदेशीरपणे फेरफार करून दुसऱ्याच्या नावे केली. या प्रकारामुळे अंबाजोगाईत खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर कारभारामुळे तलाठी व मंडळाधिकारी दीड महिन्यापूर्वी निलंबित झाले. त्यांच्या कालावधीतील बेकायदा कृत्य आता बाहेर येऊ लागले आहेत.
अंबाजोगाई शहरातील सर्व्हे नंबर ५९२ हा भाग शासकीय अध्यापक महाविद्यालय, जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, शासकीय प्रेक्षागृह इमारत, शासकीय निवासस्थान इमारत, सुरक्षा रक्षक कर्मचारी वसाहत, हे एकूण क्षेत्र १३ हेक्टर ४२ आर इतके आहे. हे क्षेत्र निजामकाळापासून अभिलेखात ‘फौज निगराणी तामिरात’ या नोंदीखाली म्हणजेच ही जमीन लष्कराच्या ताब्यातील आहे. ही जागा सैन्य दलाने ५ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी व शासनाच्या मदतीने मोजून घेतली होती. तसेच याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ही सर्व जमीन लष्कराकडे असल्याची नोंद आहे. असे असतानाही अंबाजोगाई येथील तत्कालिन तलाठी व मंडळाधिकारी यांनी संगनमत करून यातील ११ हेक्टर २२ आर (२८ एकर) शेतजमीन २९४९७ इतर फेरफार दि. २८ एप्रिल २०२० रोजीचे दुरूस्ती फेरफार पत्राचा आधार घेत सदरील जमीन अमित अशोक मुथा, उगमा कस्तूरचंद मुथा, कमल जवाहरलाल संचेती, कांचनबाई प्रदीप बोथरा, ज्योत्स्ना अशोक मुथा, ज्योती अरूण मुगदिया, प्रकाश सुरजमल मुथा, प्रमोद कस्तूरचंद मुथा, प्रेमचंद कस्तूरचंद मुथा, ललित सुगनचंद मुथा, विजय सुगनचंद मुथा, विनोद कस्तूरचंद मुथा, शोभा महावीर सुखानी, सुमित अशोक मुथा, संतोष सुरजमल मुथा, दीपक सुगनचंद मुथा यांच्या नावे हे सर्व क्षेत्र करण्यात आले.
या प्रकाराची माहिती उपअधीक्षक भूमि अभिलेख, अंबाजोगाई यांच्या कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर या कार्यालयाने सदरील शेतजमीन ही ‘फौज निगरानी तामिरात’ लष्काराच्या मालकीची असतांना या जमिनीची नोंद व्यक्तिंच्या नावावर खाजगी स्वरूपात कशी काय झाली? याची पडताळणी झाली व या संबंधीचा अहवाल महसूल विभागाला दिला. उपअधीक्षक भूमिअभिलेख यांनी दिलेल्या अहवालात ११ हेक्टर २२ आर क्षेत्राची झालेली नोंद बेकायदेशीरपणे प्रमाणित केलेली आहे. जिल्हाधिकारी बीड व लष्कर विभाग यांची परवानगी नसतांना झालेला फेरफार शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवून तसेच शासनाचा नजराना बुडवून तयार करण्यात आलेला आहे. जागेची नोंद घेतांना आंध्र प्रदेश सर्कल सिव्हील कोर्ट कंपाऊंडचे डिफेन्स इस्टेट आॅफिसर यांची परवानगी अथवा संमत्ती न घेता सातबारा उताऱ्यावर बेकायदेशीर फेरफार नोंद क्रमांक २९४९७ अन्वये संतोष मुथा, इतर नावे यांची महसूली दफ्तरी आहेत. जमीन शासकीय असल्याने व्यवहार बेकायदेशीर असल्याचे पत्र भूमिअभिलेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
तहसीलदारांकडून मागविला अहवाल
या प्रकरणाचा अहवाल तहसीलदारांकडून मागविला आहे. सर्व्हे नंबर ५९२ मधील ११ हेक्टर २२ आर हे क्षेत्र बेकायदेशीररीत्या सातबाराला लावण्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचा अहवाल आपण तहसीलदार यांच्याकडून मागविला आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. सदरील जमीन शासनाच्या मालकीची आहे. जिल्हाधिकारी अथवा आंध्र प्रदेशातील लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांच्या परवानगीशिवाय फेरफार करता येत नाही, असे उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
दीड महिन्यापूर्वी तलाठी व मंडळाधिकारी झाले होते निलंबित
शासकीय जमिनीची नियमबाह्य विल्हेवाट लावणे, क्षेत्राच्या नोंदी बदलणे, सातबारावरील नोंदी बदलणे, फेरफारबाबतच्या तक्रारी आणि अधिकार क्षेत्राबाहेरची कामे करणे अशा अनेक बेकायदेशीर कृत्याचा ठपका ठेवत, अंबाजोगाईचे मंडळाधिकारी व तलाठी यांना दीड महिन्यापूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते. त्यांच्या कार्यकाळातील निघालेले हे प्रकरण आहे. अजूनही अशी अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.