दूरचित्रवाणी वाहिन्यांचे बेकायदेशीर प्रसारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:12 AM2019-02-01T01:12:44+5:302019-02-01T01:13:33+5:30
परवाना नसतानाही खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचे बेकायदेशीररीत्या प्रसारण करणाऱ्या माजलगावच्या सना केबल नेटवर्कला स्टार कंपनीने दणका दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : परवाना नसतानाही खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचे बेकायदेशीररीत्या प्रसारण करणाऱ्या माजलगावच्या सना केबल नेटवर्कला स्टार कंपनीने दणका दिला आहे. या केबलचा चालक नसीर नजीर खान याच्यावर कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
स्टार इंडिया प्रा.लि. या कंपनीच्या अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या असून त्या सर्व वाहिन्या पेड आहेत. या वाहिन्यांच्या सिग्नलचे (लहरी) दृकश्राव्य माध्यमात रूपांतरण करण्यासाठी डिकोडर बॉक्स असतात. कंपनीसोबत लिखित करारनामा करणा-या केबल आॅपरेटरला असे बॉक्स देऊन त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना सदरील वाहिन्यांवरील कार्यक्र म दाखवण्यात येतात. मात्र, माजलगाव येथील सना केबल नेटवर्कने जून २०१८ मध्येच करार संपूनही त्यांनतर स्टार कंपनीच्या वाहिन्यांचे अवैध प्रसारण सुरूच ठेवले होते. याची माहिती मिळाल्यानंतर कंपनीने सना केबल चालक नसीर नजीर खान यास तातडीने प्रसारण थांबवून डिकोडर बॉक्स परत करण्यासंदर्भात बजावले होते. परंतु, नसीर खान याने नोटिशीला न जुमानता त्यापुढेही बेकायदेशीर प्रसारण सुरूच ठेवले. त्यानंतर स्टार कंपनीचे अॅन्टीपायरसी सल्लागार नीलेश सावंत आणि अनिल शिंदे यांनी माजलगाव येथे भेट देऊन तपासणी केली. तेव्हा काही दुकानात त्यांना सना केबलच्या सेटटॉप बॉक्सवरून स्टार भारत आणि स्टार उत्सव या वाहिन्यांचे प्रसारण होत असल्याचे दिसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. तपास एपीआय रवींद्र शिंदे करीत आहेत.