शासकीय जमिनींची विल्हेवाट; मंडळ अधिकारी कुमठकर आणि माजी तलाठी सचिन केंद्रे निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 06:52 PM2020-07-07T18:52:08+5:302020-07-07T18:55:05+5:30

शासकीय जमिनींची नियमबाह्य विल्हेवाट लावण्यासह अनेक गंभीर आरोप

Illegal Disposal of government lands; Mandal officer Kumthakar and former Talathi Sachin Kendre suspended | शासकीय जमिनींची विल्हेवाट; मंडळ अधिकारी कुमठकर आणि माजी तलाठी सचिन केंद्रे निलंबीत

शासकीय जमिनींची विल्हेवाट; मंडळ अधिकारी कुमठकर आणि माजी तलाठी सचिन केंद्रे निलंबीत

googlenewsNext
ठळक मुद्देअंबाजोगाई सजा हा सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजल्या जातो. अंबाजोगाई सजाचे चार सजे करावेत असे शासनादेश आहेत.

अंबोजागाई : शासकीय जमिनींची नियमबाह्य विल्हेवाट लावणे, क्षेत्रांच्या नोंदी बदलणे, ७-१२ वरील नोंदी बदलणे, फेरफार बाबतच्या तक्रारी आणि अधिकार क्षेत्राबाहेरची कामे करणे अशा अनेक बेकायदेशीर कृत्यांचा ठपका ठेवत अंबाजोगाईचे विद्यमान मंडळ अधिकारी आर.बी. कुमठकर आणि माजी तलाठी सचिन केंद्रे यांचे शासकीय सेवेतून निलंबन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी मंगळवारी या दोघांच्याही निलंबनाचे आदेश बजावले. यामुळे अंबाजोगाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अवघ्या पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारीत सचिन केंद्रे यांची अंबाजोगाई सजाला नियुक्ती झाली होती. अनियमिततेच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जूनमध्ये त्यांच्याकडील अंबाजोगाई सजाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला. दरम्यानच्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत तलाठी केंद्रे यांनी मंडळ अधिकारी आर.बी. कुमठकर यांच्यासोबत संगनमत करून अनेक बेकायदेशीर कृत्ये केल्याचे समोर आले आहे. फेरफार संदर्भात त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे केंद्रे आणि कुमठकर यांना ३० जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशीला केंद्रे आणि कुमठकर यांनी दिलेला खुलासा अमान्य करण्यात आला. खुलाश्यातून शासनाचे आणि खातेदारांचे हित बाधित होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

सचिन केंद्रे आणि कुमठकर यांनी नियमबाह्य पद्धतीने शासकीय जमिनींची विल्हेवाट लावली, क्षेत्रांच्या नोंदी बदलल्या, खातेदारांचे क्षेत्र कमी-अधिक केले, अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन ७-१२ बंद केल्या, नोंदी बदलल्या. तसेच न्यायालयीन निर्णयांचा चुकीचा अर्थ लावला, अनावश्यक पोटहिस्से तयार केले, मूळ अभिलेखात खाडाखोडी केल्या. काही प्रकरणात खोटे कागदपत्र तयार केले, हस्तलिखित मधून संगणकीय सातबाराकडे नोंदी घेत असताना खोटे दस्तऐवज करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे अंबाजोगाईच्या उपविभागीय कार्यकारी अधिकारी शोभा जाधव यांनी नमूद केले आहे. केंद्रे आणि कुमठकर यांची ही वर्तणूक अशोभनीय असून त्यांना सेवेमध्ये ठेवणे म्हणजे त्यांच्या बेकायदेशीर कृतीला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल असे नमूद करत शोभा जाधव यांनी दोघांच्याही निलंबनाचे आदेश दिले. निलंबन काळात केंद्रे आणि कुमठकर या दोघांनाही केज तहसिल कार्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे.

चार सजांच्या आदेशाची अंमलबजावणी करा 
दरम्यान, या घटनेमुळे अंबाजोगाई तालुक्यात खळबळ उडाली आहे. अतिशय मोठा सजा असल्याने आणि शहरात, लगतच्या परिसरात प्लाॅटींगचे दर गगनाला भिडल्यामुळे अंबाजोगाई सजा हा सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजल्या जातो. इथे नेमणूक मिळण्याठी तलाठी वरच्या पातळीवरून फिल्डींग लावत असतात. प्लाॅटींग व्यावसायिकांमुळे वाढलेल्या देवाणघेवाणीची फटका सर्वसामान्य गरजवंतांना बसतो. अंबाजोगाई सजाचे चार सजे करावेत असे शासनादेश आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची लूट थांबविण्यासाठी शासन आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.

शोभा जाधव यांचा धाडसी निर्णय 
अंबाजोगाईचे तत्कालीन तलाठी अनिल लाड यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी दबावाला न जुमानता लाड यांचे निलंबन केले होते. त्यानंतर आलेल्या केंद्रे यांचे देखील बेकायदेशीर कृत्यांमुळे अवघ्या पाच महिन्यात निलंबन करण्यातही जाधव यांनी हयगय केली नाही.

Web Title: Illegal Disposal of government lands; Mandal officer Kumthakar and former Talathi Sachin Kendre suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.