अवैध वाळू उपसा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:39 AM2021-03-01T04:39:28+5:302021-03-01T04:39:28+5:30
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा ...
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी केली जात आहे.
नाल्या तुंबल्याने त्रास
बीड : शहरातील शाहूनगर परिसरात नाल्या तुंबलेल्या असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नळाचे पाणी सोडल्यानंतर जास्तीचे पाणी रस्त्यावर येते. रस्त्यावर खड्डे पडलेले असून, याच खड्ड्यात हे सांडपाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्तीही वाढत आहे.
वीजचोरी वाढली; कारवाईची मागणी
बीड : तालुक्यातील पालसिंगण परिसरात विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावामध्ये नेहमी वीजपुरवठा खंडित होण्यामध्ये वाढ झाली आहे. याकडे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.
राजेगावचा रस्ता खराब
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण परिसरात टाकरवण ते टाकरवणफाटा-राजेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच खड्डेमय रस्त्यांवरून वाहने वाहतूक करीत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे.
वाहने हटवावीत
तेलगाव : येथील चौफाळा परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे कधी-कधी वादाचेही प्रसंग उद्भवत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
दलालांचा सुळसुळाट, सामान्यांचे हेलपाटे
वडवणी : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, वडवणी तहसील कार्यालयात दलालांची मोठी गर्दी वाढल्याने, सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात. तालुक्यातील नागरिकांची पिळवणूक होत आहे.
रस्त्यांवर खड्डे वाढले, दुरुस्ती काही होईना
पाटोदा : शहरासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली दिसून येत आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडत असून, दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्ती मात्र काही होत नसल्याचे दिसत आहे.