अवैध वाळू उपसा, ट्रॅक्टर जेसीबी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:04+5:302021-04-21T04:34:04+5:30
आष्टी : आष्टी तालुक्यातील सीना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर ...
आष्टी : आष्टी तालुक्यातील सीना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने सीना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे एक जेसीबी व ट्रॅक्टर जप्त केले. २० एप्रिल रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत अधिक माहिती देण्याचे मंडळ अधिकारी सिंघनवाड यांनी टाळले.
तालुक्यामध्ये इमारत बांधकामांसाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यामुळे वाळूला लाख मोलाचा भाव मिळू लागला आहे. कमी श्रमात अधिक नफा होत असल्याने या अवैध वाळू व्यवसायाकडे अनेकजण वळले असून, सीना नदीच्या पात्रातून चिखली, खडकत, हिंगणी, सांगवी, खानापूर परिसरांतून दररोज १० ते २० टिप्पर, ३० ट्रॅक्टर, या वाहनांच्या माध्यमातून वाळू उपसा केला जातो अशी सूत्रांची माहिती आहे. या वाळूमाफियांमुळे परिसरातील ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करूनदेखील प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.