अवैध वाळू वाहतूक; हायवासह २ ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:55 PM2019-11-22T23:55:49+5:302019-11-22T23:56:20+5:30
तालुक्यात दोन ठिकाणी वाळू तस्करी करणाऱ्या एका हायवा टिप्परसह दोन ट्रॅक्टर जिल्हा खनिकर्म विभागाने गुरुवारी रात्री कारवाई करुन पकडले.
गेवराई : तालुक्यात दोन ठिकाणी वाळू तस्करी करणाऱ्या एका हायवा टिप्परसह दोन ट्रॅक्टर जिल्हा खनिकर्म विभागाने गुरुवारी रात्री कारवाई करुन पकडले. यामध्ये जवळपास ३५ लाखाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. यामधील कारवाई केलेला हायवा टिप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात व दोन ट्रॅक्टर गेवराई तहसील कार्यालयात लावले आहेत. दरम्यान या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत आहे. तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणी अवैधरित्या वाळू साठा करुन ती वाळू रात्रीच्या दरम्यान टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. दरम्यान, याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी गुरुवारी रात्री गेवराई महसूल मधील काही कर्मचाऱ्यांना सोबत घेत वाळू वाहतूक करणा-या वाहनांविरोधात कारवाई केली.
सापळा रचून वाळू तस्करी करणारे टिप्पर ( एमएच ०४ जीसी १४७९), तर ट्रॅक्टर (एमएच २१ डी ४७४५) व अन्य एका विना नंबरचे ट्रॅक्टर अशा तीन वाहनावर कारवाई करुन ताब्यात घेण्यात आले. या अवैध वाहतूक करणाºया वाहनासह वाळू असा एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला. ही कारवाई जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, किशोर तांदळे, सुरक्षा रक्षक सानप, गात, भोंडवे आदींनी केली. दरम्यान, महसूल पाठोपाठ जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनीही अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून, यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.