अवैधरीत्या वाळूसाठा, वाहतूकदारांना जिल्हाधिकाऱ्यांची तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:36 AM2019-06-21T00:36:05+5:302019-06-21T00:36:25+5:30
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गुरुवाजी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांच्या समवेत इतर महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बौठक घेतली, विशेष म्हणजे या बैठकीस हायवा चालक व कंत्राटदार हे देखील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेवाराई तालुक्यातील राजापूर येथे कारवाई करुन २१०० ब्रासपेक्षा अधिक वाळू साठा जप्त करुन कारवाई केली होती. त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गुरुवाजी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांच्या समवेत इतर महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बौठक घेतली, विशेष म्हणजे या बैठकीस हायवा चालक व कंत्राटदार हे देखील उपस्थित होते.
यावेळी बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व महसूल व पोलीस अधिका-यांना वाळूच्या संदर्भात सूचना केल्या, तसेच ज्या क्षेत्रामध्ये अवैध वाळू साठा किंवा वाहतूक करताना कारवाई केली जाईल त्या ठिकाणच्या महसूल व पोलीस प्रशासनातील अधिका-यांची जबाबदारी ग्राह्य धरुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे वाळूच्या धंद्यामधून अर्थकारण करणा-या अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी नेमून दिलेल्या अधिका-यांच्या पथकांकडून गस्ती घातल्या जातील. यावेळी जर कोणी वाहतूक व साठा सापडल्याचे समोर आले तर तात्काळ कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्वांनी सूचनांचे पालन करावे असे देखील जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले.
पर्यावरणाचा -हास होत असल्यामुळे वाळू तस्करीसंदर्भात कायदे कढक आहेत. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करताना हायवा पकडा तर चालकाचे मोठ्या प्रमाणात नुसान होते. कारण कार्यवाही पूर्ण होईपर्यंत गाडीमध्ये वाळू भरलेली असल्यामुळे हायवाचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. त्यामुळे हायवा चालकांनी देखील अवैध वाळू वाहतूक करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केले आहे. यावेळी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी देखील उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना अवैध वाळू वाहतूक आणि साठे रोखण्यासंदर्भात सूचना केल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, सर्व तहसीलदार व पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी वाळू वाहतूक करणारे हायवा चालक व कंत्राटदार यांना देखील जिल्हाधिकाºयांनी अवैध वाळू व्यवसाय न करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
उंदीर- मांजराचा खेळ सोडा
अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा चालक चोरी लपवण्यासाठी व कारवाईपासून वाचण्यासाठी मर्यादेक्षा अधिक स्पीडने हायवा पळवतात त्यामुळे अपघाताची शक्यता असते, तरी देखील प्रशासनातील अधिकारी त्यांचा पाठलाग करुन गाडी पकडतात, हा ‘उंदीर मांजराचा खेळ’ अवैध वाळू वाहतूकदारांनी सोडावा कारण प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांना इतर देखील महत्त्वाची कामे असतात, असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले.
अंगरक्षकांची नियुक्ती
ज्या ठिकाणी वाळूपट्टा आहे, त्या ठिकाणच्या तहसीलदारांना माजी सैनिक अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा गौण खनिज अधिका-यासोबत ४ माजी सैनिकांचे पथक संरक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक व तस्करांना आळा घालण्यास मदत होणार आहे.