अस्वच्छतेमुळे बळावतोय आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:23+5:302021-04-06T04:32:23+5:30
उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका अंबाजोगाई : शहरात मुख्य मार्गावर तसेच मोंढा परिसरात बसस्थानक परिसर, मंडीबाजार अशा महत्त्वाच्या ठिकाणी ...
उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका
अंबाजोगाई : शहरात मुख्य मार्गावर तसेच मोंढा परिसरात बसस्थानक परिसर, मंडीबाजार अशा महत्त्वाच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर वाहने मोठ्या प्रमाणात उभी असतात. शहरातील मंडीबाजार व प्रशांत नगर परिसरात रस्त्यावर वाहने उभे करणाऱ्यांची मोठी संख्या असते. परिणामी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प राहते, तर समोर उभ्या असलेल्या वाहनांमुळे लहान मोठे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहे. हा धोका टाळण्यासाठी रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक विभागाने कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप यांनी केली आहे.
विद्युत पंप जोडण्यासाठी लगबग
अंबाजोगाई : मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून कॅनॉलमध्ये उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. कॅनॉलच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे आता मिळणारे पाणी उसाला देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. कॅनॉलवर विद्युत पंप बसविणे, त्यासाठी महावितरणकडून वीजजोडणी करून घेणे ही कामे प्राधान्यक्रमाने सुरू आहेत. धरणातून पाणी सोडल्यानंतर विद्युत प्रवाहही खंडित होऊ नये, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना साकडे घातले जात आहे.
मोहोर गळाल्यानं आंबा उत्पादनात घट
अंबाजोगाई : वातावरणातील बदलांमुळे व सलग दोनवेळा एकाच महिन्यात गारपीट झाली. त्यामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात गळाला. गावरान आंब्याला तर मोहोर झडल्याने आंबेच राहिले नाहीत. तालुक्यात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेतात. यावर्षी गारपिटीमुळे मोहोर गळाला. त्यामुळे आंबे मोठ्या प्रमाणात झडून गेले. याचा मोठा फटका आंबा उत्पादकांना बसला आहे. बाहेरून येणाऱ्या आंब्यावरच अंबाजोगाईकरांची आंब्याची हौस भागणार आहे.
बँकांसमोर रांगा
अंबाजोगाई : मार्च अखेरमुळे बँकांना असलेली सुटी तसेच होळी, शनिवार, रविवार नंतर धुलिवंदनाची आलेली सुटी. यामुळे बँका बंद राहिल्या. बँका बंद राहिल्यामुळे नागरिक अनेक दिवस व्यवहारासाठी घराच्या बाहेरच पडले नाहीत. त्यातच कोरोनाची वाढती रुग्णसंख्या यामुळे अगोदरच घाबरलेल्या नागरिकांना मोठ्या सुट्यानंतर बँकांमध्ये आता मोठ्या रांगाचा सामना करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना व महिलांनाही रांगेत उभारून बँकेचे व्यवहार पूर्ण करावे लागत आहे.
पाण्याअभावी झाडे वाळू लागली
अंबाजोगाई : शहरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. अंबाजोगाई शहरात वनविभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांचे संगोपन त्यांच्यावतीने केले जाते. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने अनेक झाडे वाळू लागली आहेत. अशा स्थितीत पर्यावरणप्रेमींनी आपल्या परिसरातील वृक्ष वाळू नयेत यासाठी लोकसहभागातून या झाडांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वृक्षमित्र मुन्ना सोमाणी यांनी केली आहे.
उकाडा वाढल्याने थंड पेयांना मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून थंड पेयांची मागणी वाढली आहे. जसजसे उन्हाचे तापमान वाढत चालले तसे लिंबू सरबत, उसाचा रस, लस्सी या पेयांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व सतत पडणाऱ्या लॉकडाऊनमुळे हे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. अशाही स्थितीत नागरिकांना दिलासा देणारे थंड पेय उपलब्ध करून देण्यासाठी अनेक व्यावसायिक पुढाकार घेत आहेत.