महाराष्ट्राच्या रथावर झळकणार संत शेख महमंद महाराजांची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:06+5:302021-01-25T04:34:06+5:30
आष्टी : येथील संत शेख महंमद महाराजांची प्रतिमा यंदा प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथ येथील परेडमध्ये महाराष्ट्राच्या रथावर विराजमान होणार ...
आष्टी : येथील संत शेख महंमद महाराजांची प्रतिमा यंदा प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथ येथील परेडमध्ये महाराष्ट्राच्या रथावर विराजमान होणार आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा या सांस्कृतिक दर्शन घडवणाऱ्या चित्ररथात ही प्रतिमा असेल.
महाराष्ट्राची संत परंपरा ही या चित्ररथाची थीम आहे. सुरुवातीला संत ज्ञानेश्वर माऊली यांची प्रतिमा असेल नंतर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सुवर्णक्षण फिरत्या देखाव्यावर असेल. त्यापाठोपाठ या रथाच्या चोहोबाजूने महाराष्ट्रातील १४ संतांच्या प्रतिमा असतील. यामध्ये संत नामदेव महाराज, संत सेना महाराज, संत जनाबाई, संत शेख महंमद महाराज, संत निळोबा महाराज, संत गोरोबा महाराज आदींचा समावेश आहे. या चित्ररथावर या संतांची अभंगवाणीही साकारली आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या व मराठी भाषेत विपुल लेखन ग्रंथसंपदा असणाऱ्या येथील संत शेख महंमद महाराजांचे कार्य दिल्लीच्या राजपथावर झळकणार असल्याने वाहिरा आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
औरंगजेबाच्या शासनकाळात धर्मातील विरोध झुगारून शेख महंमद महाराज श्रीक्षेत्र वाहिरा, ता. आष्टी यांनी समतेवर आधारित वारकरी पंथाच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार केला होता. राजपथावरील परेडमध्ये रथावर शेख महंमद महाराज यांची प्रतिमा समाविष्ट झाल्याने आष्टीकरांची मान उंचावली आहे.