बीडमधील भुयारी गटार, पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ मार्गी लावा; पालकमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:52 PM2020-02-07T12:52:32+5:302020-02-07T12:58:29+5:30
लोकमत इम्पॅक्ट : शहरात अट्टल अमृत योजनेतंर्गत १६५ कोटी ८० लाख रूपयांची भुयारी गटार योजना राबविली जात आहे.
बीड : बीड शहरात पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम रखडले आहे. हीच बाब ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणली. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी मुंबईत बैठक घेत दोन्ही योजनेचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले.
तसेच याचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीही नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. रखडलेल्या कामावरून बीड पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
बीड शहरात अट्टल अमृत योजनेतंर्गत १६५ कोटी ८० लाख रूपयांची भुयारी गटार योजना राबविली जात आहे. २४ महिन्यात ही योजना पुर्ण करणे अपेक्षित होते. परंतु १८ महिन्यात केवळ ३२ किमीचेच काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून या योजनेच्या कामावर नियंत्रण आहे. परंतु मजिप्रने पालिका जागा उपलब्ध करून देत नाही, असे कारण सांगितले आहे. तर पालिकेने जागा सोडून इतर कामे करण्यास मजिप्रला काय अडचण आहे? आमच्याकडून पाठपुरावा सुरूच आहे, असे सांगितले जात आहे. दोघांच्या टोलवाटोलवीमुळे शहरवासीयांमध्ये संताप आहे.
पालिका व मजिप्र अभियंत्यांची बाजू घेऊन ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. यावर लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले. गुरूवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह मजिप्रचे सभप महाजन, नगरविकासचे पा.पो. जाधव, आर.एस.लोलापोड, पी.आर.नंदनवरे, व्ही.आर.बडे, एम.एच.पाटील, पालिकेचे अभियंता राहुल टाळके आदींची उपस्थिती होती. मुंडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची कानउघडणी करीत दोन्ही योजनांचे कामे तात्काळ मार्गी लावण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच त्रिसदस्यीय समिती नियूक्त केली जाणार असल्याचे सांगितले. यामध्ये एक आमदार, नगरविकास व मजिप्रचे वरिष्ठ अधिकारी असणार आहेत.
जागा उपलब्ध करून देणार - संदीप क्षीरसागर
भुयारी गटार योजनेत मल निसारण केंद्र आणि पंपिंग स्टेशनला जागा नसल्याने काम रखडल्याचे मजिप्रकडून सांगण्यात आले आहे. आता ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे, आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे. तसेच विकास कामांत दिरंगाई करू नये. वेळप्रसंगी निधी कमी पडल्यास तो आम्ही आणू, असेही क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.