खाण्याचा सोडा वापरून घरच्या घरी करा गणेशमूर्तींचे विसर्जन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:51+5:302021-09-06T04:37:51+5:30
बीड : गणेशोत्सव जवळ आला असून यंदा जलप्रदूषण टाळण्यासाठी बाजारात मागणीनुसार शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या आहेत. ...
बीड : गणेशोत्सव जवळ आला असून यंदा जलप्रदूषण टाळण्यासाठी बाजारात मागणीनुसार शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या आहेत. तरीदेखील अजूनही बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्याच मूर्ती मोठ्या प्रमाणात आहेत. या मूर्तींचे खायचा सोडा वापरून घरच्या घरीच विसर्जन करता येते. त्यामुळे आवडीची कोणतीही मूर्ती आणा, पण घरच्या घरी विसर्जन करून सार्वजनिक ठिकाणच्या जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण टाळता येणार आहे.
मागील काही वर्षांपासून जलप्रदूषण टाळण्यासाठी पीओपीविरोधात जनजागरण सुरू आहे. गणेशोत्सव आला की जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन सामाजिक संघटना करीत असतात. मात्र शाडूची माती किंवा मूर्ती बनविण्यासाठी लागणारी क्ले माती बीडसारख्या भागात उपलब्ध होत नसल्याने तसेच शाडूच्या मूर्ती तयार होण्यास बराच कालावधी लागत असल्याने लवकरात लवकर तयार होणाऱ्या पीओपीच्या मूर्ती बनविण्याकडे येथील कारखानदारांचा कल राहिलेला आहे.
पीओपीच्या मूर्तींचीच अधिक विक्री
पीओपी शाडू मातीपासून बनविलेले
२०१९ ५०००० ४०००
२०२० ३०००० १०००
२०२१ (अपेक्षित) ४०००० ७०००
असे असावे सोड्याचे प्रमाण
मूर्तीची उंची पाण्याचे प्रमाण (लीटरमध्ये) खाण्याचा सोडा (किलो)
७ ते १० इंच १२ २
११ ते १४ इंच २० ते २२ ४
१५ ते १८ इंच ५० ६
३) ४८ तासांत विरघळते मूर्ती
गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करणे अगदी सोपे आहे. खाण्याचा सोडा कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होते. गणेशमूर्ती पूर्ण बुडेल एवढे पाणी बकेटमध्ये घेऊन त्यामध्ये गणेशमूर्तीचे वजन आहे तेवढा खाण्याचा सोडा घालावा आणि त्यामध्ये मूर्तीचे विसर्जन करावे. खाण्याचा सोडा वापरला असेल तर साधारण चार दिवस मूर्ती विरघळण्यासाठी वेळ लागतो, असे मूर्तिकारांनी सांगितले.
नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर
खाण्याचा सोडा वापरून पीओपी मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन केल्यानंतर चार दिवसांनी चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते. ते तुळस अथवा परसबागेतील किंवा कुंडीतील फुलझाडांना वापरता येते. तसेच शाडू मातीची मूर्ती असेल तर साध्या पाण्यात विसर्जन केल्यास काही तासात पूर्णत: विरघळते. त्यामुळे जलप्रदूषण टळते आणि खतही मिळते, असे मूर्ती विक्रेते सचिन पवार यांनी सांगितले.
शाडूच्या मूर्तींना मागणी
आता पीओपीवर प्रतिबंध आल्यापासून मूर्तिकार शाडूची मूर्ती बनविण्याकडे वळले आहेत. कोरोनामुळे मागील वर्षी मूर्तींची विक्री कमी झाली. यंदाही तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे उत्पादनात घट झाली आहे. बाजारात पीओपी तसेच शाडू मातीच्या गणेशमूर्ती ५० रुपयांपासून अकरा हजार रुपयांपर्यंत उपलब्ध झाल्या आहेत. सहज विसर्जन होणाऱ्या शाडूच्या मूर्तींना चांगली मागणी आहे.
- अर्जुन दळे, मूर्तिकार तथा व्यावसायिक, बीड