ग्रामपंचायतींमध्ये लसीकरणाचा अहमदनगर पॅटर्न राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:31 AM2021-05-15T04:31:51+5:302021-05-15T04:31:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण केले जात आहे. ही पद्धत बीड जिल्ह्यासह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण केले जात आहे. ही पद्धत बीड जिल्ह्यासह आष्टी तालुक्यात सुरु करावी, अशी मागणी सराटेवडगावचे सरपंच प्रा. डाॅ. राम बोडखे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाची लस देण्याचे ठिकाण ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रापुरतेच मर्यादित असल्यामुळे इतर गावातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. लस घेण्यास केंद्रापर्यंत जाण्यासाठी १० ते १५ किलोमीटर जावे लागत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गरीब लोकांना केंद्रावर ये-जा करण्यासाठी वाहनाची सोय नाही तसेच सुरु असलेल्या लसीकरणामध्ये वशिलेबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. लोकांची सोय होण्यापेक्षा हालच जास्त होत आहेत. ६ ते ७ तासांपेक्षाही जास्त वेळ केंद्रावर लोकांना ताटकळत बसावे लागत आहे. हे सर्व सुखकर होण्यासाठी आपण जर प्रत्येक गावामधील ग्रामपंचायतीत लसीकरणाची सोय केली तर जनतेचे हाल होणार नाहीत. ही पद्धत अहमदनगर जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात ही पध्दत सुरू करावी. लसीकरण करण्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायतींची राहील. हे नियोजन करताना अगोदर दुसरी लस घेणारे, त्यानंतर अपंग, ज्येष्ठ नागरिक व शेवटी लसीकरणाच्या दिवशी सर्वप्रथम यांच्या हातावर मार्कर पेनने नंबर टाकून लसीकरण केले तर तालुक्यातील प्रत्येक गावाला योग्य न्याय मिळेल. सर्व गावांमध्ये लसीकरण केले तर सर्वांना योग्य न्याय मिळेल व लोकांचे हाल होणार नाहीत. आशा सेविकाही मदतीला राहतील. गावागावात लसीकरण करण्याची मागणी सर्वसामान्य ग्रामस्थांचीही आहे.