योजना राबवून देखील शेतकरी आत्महत्या रोखण्यात शासन सपशेल अपयशी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:47 AM2018-12-24T00:47:50+5:302018-12-24T00:48:24+5:30
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. या परिस्थितीमुळे २०१८ या वर्षात जवळपास १८७, तर २०१२ पासून ७ वर्षांच्या कालावधीत जवळपास १२०० शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. या परिस्थितीमुळे २०१८ या वर्षात जवळपास १८७, तर २०१२ पासून ७ वर्षांच्या कालावधीत जवळपास १२०० शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली.
शेतक-यांनी आत्महत्या करु नयेत यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्याचा दावा केला जातो. परंतु योजनांची योग्यरित्या अंमलबाजवणी होत नसल्यामुळे शेतक-यांना लाभ मिळत नाही. जेवढा निसर्ग या आत्महत्येला कारणीभूत आहेत तेवढेच शासन देखील अशी भावना शेतक-यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात एक वर्षाआड दुष्काळाची दाहकता सहन करावी लागते त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडलेले असते यातच कर्जबाजारीपणा व नापिकी ही पाचवीला पुजलेली असल्यामुळेच की काय, आत्महत्या केलेल्या बहुतांश शेतक-यांजवळ नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहोत या आशयाची चिट्ठी सापडते. त्यामुळे शासकीय योजना नेमक्या कुठे वापरल्या जातात व कोणाचं भलं करतात, असा प्रश्न शेतक-यांमधून विचारला जाऊ लागला आहे.
वैरण विकास
शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पशुपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. जनावारांच्या चा-यासाठी कडबाकुट्टी व चारा कात्रण करण्यासाठी यंत्राची मागणी ४९ शेतकरी कुटुंबाने केली होती मात्र, त्यापैकी फक्त २१ जणांना या योजनेचा लाभ देण्यात आल आहे.
कौशल्य विकास अंतर्गत १४४ जणांनी केली रोजगाराची मागणी
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १४४ सदस्यांनी रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यापैकी फक्त १२ जणांना लाभ देण्यात आला आहे. १३२ जण लाभापासून वंचित आहेत.
आरोग्यविषयक उपचार
या कुटुंबातील १९१ जणांनी आरोग्यविषयक उपचाराची मागणी उभारी अंतर्गत केली होती. मात्र, त्यापैकी १२६ जणांना विविध आजारांवर उपचार करुन लाभ देण्यात आला आहे. ६५ जण या योजनेपासून वंचित आहेत.
कर्ज देण्यास टाळाटाळ
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ३१९ जणांनी शेतीपूरक व्यवसाय व पीककर्जासाठी बँकेकडे मागणी केली होती. परंतु या योजनेंतर्गत ३४ जणांना लाभ देण्यात आला आहे, तर २८५ कुटुंबियांना मात्र कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
शेतीमध्ये वीजजोडणी
शेतामधील पिकांना पाणी देण्यासाठी शेतात वीज जोडणी करुन देण्यात यावी, अशी मागणी ३३० शेतकरी कुटुंबियांनी केली होती. त्यापैकी १९० जणांना लाभ देण्यात आला आहे. २१० जण अद्यापही या योजनेपासून वंचित आहेत.
घरी वीजेची जोेडणी
राहत्या घरी वीज जोडून देण्याची मागणी ३७४ शेतकरी कुटुंबियांनी केली होती. त्यापैकी २८४ जणांना वीजजोडणीचा लाभ मिळाला आहे. ९० जण अद्यापही वंचित आहेत.
२३० कुटुंबियांना मिळाली नाही विहीर
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उभारी योजनेंतर्गत शेतात विहीर देण्यात येते. यामध्ये ५८६ शेतकºयांनी विहिरीची मागणी केली होती. पैकी ३५६ जणांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे २३० कुटुंबीय विहीर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
शेततळे
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ७० जणांनी शेततळ्याची मागणी केली होती. त्यापैकी फक्त १७ जणांना शेततळ्याचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे ५३ कुटुंबीय अद्यापही शेततळ्यापासून वंचित आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षेचा दिला लाभ
अन्नसुरक्षा योजनेंतर्गत ७८८ शेतकरी कुटुंबियांनी मागणी केली होती. या योजनेचा पूर्णपणे लाभ देण्यात आला आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजना
महात्मा फुले योजनेंतर्गत ५५ शेतकरी कुटुंबाना मागणी केली होती. त्यापैकी ५३ कुटुंबियांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
शुभमंगल सामूहिक विवाह
योजनेत उदासीनता
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांतील तरुण-तरुणींच्या विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत १०५ जणांनी मागणी केली होती. त्यापैकी फक्त १३ जणांनाच याचा लाभ झाला आहे. त्यामुळे सामूहिक विवाह योजनेत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.
हॉस्टेल सुविधेसाठी
विद्यार्थ्यांच्या फेºया
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील विद्यार्थी शिक्षणासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये आहेत. त्यांना हॉस्टेल सुविधा उपलब्ध करुन देण्याची योजना ‘उभारी’मध्ये समाविष्ट आहे. या योजनेंतर्गत २३३ जणांनी हॉस्टेल सुविधेची मागणी केली होती. त्यापैकी ३८ जणांना लाभ देण्यात आला आहे. अद्यापही १९५ विद्यार्थी हॉस्टेल सुविधेपासून वंचित आहेत.
२३५ कुटुंबीय उघड्यावर
५६५ शेतकरी कुटुंबियांनी शौचालयाची मागणी केली होती. त्यापैकी ३३० जणांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे २३५ कुटुंबीय अद्यापही उघड्यावरच शौचास जातात.
घरकूल योजनेचा लाभ नाही
८६३ शेतकरी कुटुंबियांनी पक्की घरे बांधण्यासाठी घरकूल योजनेची मागणी केली होती. त्यापैकी २२८ जणांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे अद्यापही ६३५ कुटुंबीय पक्क्या घराविनाच असल्याचे दिसून येते.
जनधन बँक खाते
विविध आर्थिक व्यवहाराकरिता जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी ३३५ जणांनी मागणी केली होती. त्यापैकी ३१८ जणांना याचा लाभ देण्यात आला आहे.
कुटुंब अर्थसहाय्य योजना
८० शेतकरी कुटुंबियांनी या योजनेंतर्गत मागणी केली होती. त्यापैकी ५४ जणांना लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे २६ जण कुटुंब अर्थसहाय्य योजनेपासून वंचित आहेत.
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत वेतन
या योजनेंतर्गत ५४४ जणांनी मागणी केली होती. या योजनेच्या माध्यमातून प्रतिमाह वेतन दिले जाते. यामध्ये उभारी अंतर्गत ५१७ जणांना याचा लाभ देण्यात आला आहे. २७ जण अद्यापही योजनेपासून वंचित आहेत.
सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता टंचाई उपायोजनबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना उभारी देण्याची गरज आहे.