माहिती अधिकारात मिळवली शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची कोरी सेवा पुस्तिका
By शिरीष शिंदे | Published: November 29, 2022 02:29 PM2022-11-29T14:29:27+5:302022-11-29T14:30:00+5:30
केवळ राजपत्रित व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवा पुस्तिकेचा होतो वापर
बीड: माहिती अधिकारातून केवळ शासकीय माहिती प्राप्त होते हे सर्वश्रुत आहे, मात्र त्याही पलिकडे जाऊन गेवराई येथील एका माहिती अधिकार प्रशिक्षक तथा अभ्यासकाने माहिती अधिकारातून राजपत्रित व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असणारी कोरी सेवा पुस्तिका मिळवली आहे. या कोऱ्या सेवा पुस्तिकेवर माहिती अधिकाराचे शिक्के असून शासकीय दस्त असल्याने ती प्राप्त झाली आहे. कोरी सेवा पुस्तिका मिळत असल्याने विद्यमान किंवा कार्यरत अधिकाऱ्यांची सेवा पुस्तिका मिळण्याचा मार्ग खुला झाला असल्याचे मानले जात आहे.
गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील किरण नारायण नंनवरे हे माहिती अधिकार अभ्यासक असून पुणे येथील यशदाचे प्रशिक्षण प्राप्त असलेले अभ्यासक यांनी मुंबई येथील मंत्रालयातील मुख्य सचिवांना माहिती अधिकाराच्या २००५ च्या कलम २ (त्र) किंवा अन्य कलमानुसार शासन सेवेत आल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारी सेवा पुस्तिका कोरी स्वरुपात द्यावी अशी मागणी केली. जी माहिती संसदेला किंवा राज्य विधान मंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तीला देण्यासही नकार देता येणार नाही अशी टीप नंनवरे यांनी सदरील माहिती अधिकारी पत्रावर टाकली होती. प्रारंभी त्यांना नकार देण्यात आला मात्र प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव रा.का. धनवाडे यांच्या समोर सुनावणी झाली.नंनवरे यांनी माहिती अधिकारी अधिनियमातील कलम ६ (३) अन्वये हस्तांतरीत करणे किंवा माहिती अधिकार अधिनियमातील कलम २ त्र (३) नुसार माहिती देणे अपेक्षित असल्याचे अपिलमध्ये नमूद केले होते. सुनावनी दरम्यान झालेल्या युक्तीवादानंतर सह सचिव धनवाडे यांनी किरण नंनवरे यांना कोरी सेवा पुस्तिका निशुल्क उपलब्ध करुन देण्याबबात संबंधितांना आदेशीत केले.
काय असते सेवा पुस्तिकेत ?
शासन सेवेत असणाऱ्यांसाठी सेवा पुस्तिकेला अनन्य साधारण महत्व आहे. या पुस्तिकेचा नमूना शासनाच्या वित्त विभागामार्फत तयार करण्यात येतो. त्याची छापाई पुणे येथील शासकीय मुद्राणालयात होते. शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या राजपत्रित व अरापत्रित शासकीय कर्मचाऱ्यांकरीता एकाच दर्जाचे सेवा पुस्तक वापरण्यात येते. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येक स्वतंत्र सेवा पुस्तिका दिली जाते. त्यामध्ये संबंधित कर्मचारी यांची चौकशी, बदली, दंड यासह इतरबाबी त्यात वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी नोंदी घेतात. त्यामुळे सेवा पुस्तिकेला विशेष महत्व असते.