बीडमध्ये स्वमूल्यांकनामुळे आरोग्य सेवेत सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:00 AM2018-08-23T01:00:02+5:302018-08-23T01:00:31+5:30
कार्पोरेट कंपन्यांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच टिकवून ठेवण्यासाठी, कर्मचाऱ्यांना अभिप्रेरणा देण्यासाठी मूल्यांकन पध्दतीचा वापर केला जातो. हा ट्रेंड आता निमशासकीय संस्था, कार्यालये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये रुजत आहे. बीड जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य विभागाने स्वमूल्यांकनाचा प्रयोग राबविणे सुरु केले.
अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कार्पोरेट कंपन्यांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच टिकवून ठेवण्यासाठी, कर्मचाऱ्यांना अभिप्रेरणा देण्यासाठी मूल्यांकन पध्दतीचा वापर केला जातो. हा ट्रेंड आता निमशासकीय संस्था, कार्यालये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये रुजत आहे. बीड जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य विभागाने स्वमूल्यांकनाचा प्रयोग राबविणे सुरु केले.
पहिल्या वर्षीचा प्रयोग यशस्वीदेखील ठरला. यामुळे ग्रामीण भागात रुग्णसेवा सुधारत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. स्वमूल्यांकनाच्या या पध्दतीमुळे या सेवेत सातत्य आणि दर्जेदारपणा त्याचबरोबर रुग्णांचे समाधान वाढीस लागत आहे. असे असले तरी औषध तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरून औषधे खरेदी करावी लागत आहेत.
१०० गुणांचे मूल्यमापन : ५० आरोग्य केंद्रे
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने वर्षभरात २० बाबींचे मूल्यांकन केले होते. यात प्रत्येक बाबीला ५ गुण असे शंभर गुणांचे हे मूल्यांकन करण्यात आले. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाºयांनी यात उत्स्फूर्तपणे काम केले. त्यामुळे आरोग्य विभागाचा आलेख उंचावण्यास मदत झाली आहे.
४१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीतील कामकाजाचे हे मूल्यांकन करण्यात आले. यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश होता.
असे केले मूल्यांकन
या प्रयोगात मॉनिटरींग इव्हॅल्युएशन अधिकारी म्हणून कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्रत्येक आरोग्य केंद्राचा मासिक डाटा गोळा करुन वार्षिक डाटा गोळा करण्यात आला.
या विषयांवर मूल्यांकन
बाह्यरुग्ण तपासणी, प्रा. आरोग्य केंद्रातील प्रसुती, आंतररुग्ण, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, तांबी (प्रसुती पश्चात), गरोदर माता नोंदणी, संरक्षित व बालकांचे लसीकरण, क्षयरोग, मलेरिया, वैद्यकीय अधिकाºयांनी कार्यक्षेत्रात दिलेल्या भेटी आदी मुद्यांवर मूल्यमापन करण्यात आले.
मूल्यांकनातून निघालेले निष्कर्ष
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्वाधिक ८३ गुण मिळाले. पाठोपाठ तलवाडा आणि पात्रुड प्राथमिक आरोग्य केंद्र (दोन्ही केंद्रांना ७५ गुण) राहिले. चौथ्या क्रमांकावर चौसाळा तर पाचव्या क्रमांकावर उमापूर प्राथमिक आरोग्य केंद्र राहिले. जातेगाव, किट्टी आडगाव, नाळवंडी, निपाणी जवळका, शिरुर प्राथमिक आरोग्य केंद्रांना ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले.
तालुकानिहाय गुणवत्तेत अंबाजोगाई प्रथम (६८ गुण) तर शिरुर आणि गेवराई तालुके दुसºया क्रमांकावर (६६ गुण) राहिले तर बीड तालुका तिसºया क्रामंकावर राहिला. परळी, केज आणि पाटोदा तालुक्यात सुधारणा करावी लागणार आहे. या मूल्यांकन पध्दतीमुळे कार्य गुणवत्तेत सुधारणा दिसून येत आहेत. मागील तुलनेत प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट वाढले आहे. आंतररुग्ण आणि बाह्य रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
इमारत, औषधांसाठी लक्ष देण्याची गरज
वहाली, नागापूर, टाकरवण, डोंगरकिन्ही आणि मोहा प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र पिछाडीवर राहिले आहेत. तेथे काम सुधारण्याची गरज असल्याचे या मूल्यांकनातून अधोरेखित झाले.
दहा ठिकाणी असुविधा
शिरुर तालुक्यातील खालापुरी, माजलगावातील सादोळा, परळीतील पोहनेर, धर्मापुरी, आष्टीतील सुलेमान देवळा, वहाली प्राथमिक आरोग्य केंद्रांत असुविधा असल्याने तेथे गरजेनुसार उपायोजना करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून होत आहे.
इमारती मोडकळीस
या मूल्यांकनातून काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना इमारत नसल्याने सेवेत अडचणी येत असल्याची माहिती पुढे आली. आष्टी तालुक्यात सुलेमान देवळा, खुंटेफळ, धामणगाव, केज तालुक्यात चिंचोली माळी, विडा इमारती मोडकळीस आल्या आहेत. काही ठिकाणी कामे सुरु आहेत.