लोकवस्तीत आढळला १० फुटाचा अजगर; सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडला
By सोमनाथ खताळ | Published: July 6, 2024 06:52 AM2024-07-06T06:52:41+5:302024-07-06T06:53:16+5:30
बॅटरीच्या उजेडाने पाहणी केली असता एका झाडाच्या बुडाला वेडा मारून बसलेला हा साप नसून अजगर असल्याचे समजले.
बीड - मध्यरात्रीच्या वेळी बॅटरीच्या उजेडात मोठा साप दिसला. ग्रामस्थांनी तातडीने सर्पमित्रांना फोन केला. त्यांनीही मध्यरात्री १५ किमी अंतर पार करून याची खात्री केली. यावेळी हा साप नसून १० फुटाचे अजगर असल्याचे समजले. त्यानंतर त्याला पकडून इमामपूर रोड परिसरातील जंगलात सुखरूप सोडण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील मांजरसुंबा गावाजवळील वस्तीवर घडला.
बीडहून मांजरसुंबाकडे जाताना डोंगराच्या पायथ्याला कपिलधार कमान आहे. याच रस्त्यावर एक लोकवस्ती आहे. येथील लोकांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रस्त्यावरून एक साप जाताना दिसला. त्यांनी घाबरून आरडाओरडा केला. येथील काही लोकांकडे सर्पमित्रांचा संपर्क क्रमांक होता. त्यांनी मध्यरात्रीच त्यांना संपर्क केला. ते देखील अवघ्या काही मिनिटांमध्ये बीडवरून वस्तीवर पोहचले. बॅटरीच्या उजेडाने पाहणी केली असता एका झाडाच्या बुडाला वेडा मारून बसलेला हा साप नसून अजगर असल्याचे समजले. सर्पमित्र दीपक वाघमारे, विशाल मिसळे, जयदीप ओव्हाळ, दीपक धुरंधरे, अजय डाके यांनी सतर्कता बाळगत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी बीड शहरापासून जवळ असलेल्या इमामपूर रोडवरील जंगलात या अजगराला सोडून देण्यात आले. ग्रामस्थांची सतर्कता आणि सर्पमित्रांच्या वेळीच मिळालेल्या मदतीमुळे अजगराला जीवदान मिळाले आहे.