गैरहजेरीबाबत विचारताच सीएचओंच्या पतीकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
By सोमनाथ खताळ | Published: September 16, 2022 02:42 PM2022-09-16T14:42:05+5:302022-09-16T14:42:37+5:30
धारूर तालुक्यातील आसोला आरोग्य उपकेंद्रातील घटना : वैद्यकीय अधिकाऱ्याने मॅग्मो संघटनेकडे मांडली कैफियत
- सोमनाथ खताळ
बीड : धारूर तालुक्यातील आसोला आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली. येथील वारंवार गायब असणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा करताच त्यांच्या पतीने डॉक्टरला बाहेर हाकलले. शिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात नोंद झाली नसली तरी डॉक्टरने मॅग्मो संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे.
धारूर तालुक्यात रूई धारूर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याच अंतर्गत आसोला उपकेंद्र येते. सीएचओ म्हणून भाग्यश्री भोसले कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास रूई धारूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा पवार यांनी उपकेंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी भाेसले यांना वारंवार गैरहजर रहात असल्याबाबत जाब विचारला. याचवेळी भोसले यांचे पती डॉ.अरविंद निपटे तेथे आले. त्यांनी डॉ.पवार यांना अरेरावीची भाषा वापरत उपकेंद्रातून बाहेर हाकलले. शिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली. विशेष म्हणजे डॉ.निकटे हे देखील धारूरमध्ये रूग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हा प्रकार घडताच डॉ.पवार यांनी मॅग्मो संघटनेला संदेश पाठवून मदत करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या सदस्यांनी त्यांन आधार देत पोलीस तक्रार देण्याचा सल्ला दिला. परंतू दुपारी २ वाजेपर्यंत कसल्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.
मॅग्मोकडे मागितली मदत
आज प्रा.आ.केंद्र रूईधारूर येथील आसोला उपकेंद्राला भेट दिली, तेथील सीएचओ प्रत्येक भेटी ला गैरहजर होत्या. तर आज सीएचओचे मिस्टर मला येऊन आरेरावी, शिव्या व उपकेद्राच्या बाहेर निघ तुला जीवे मारून टाकतो व तसेच आज जर निट निघालास, नसीब तुज. निघ बाहेर (उपकेंद्राच्या) जीवे मारण्याची धमकी दिली. तरीही मॅग्मोनी यामध्ये लक्ष केंद्रित करावे, असा मेसेज सोशल मिडीयाच्या ग्रुपवर पाठवून मदत मागितली आहे. यावर सर्वच सदस्यांनी त्यांना संपर्क करून तक्रार देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अनेकांनी मानसिक आधार दिला.
वैद्यकीय अधिकारी आणि सीएचओ या दोघांनाही बोलावले आहे. दोघांनाही समोरासमोर बसवून म्हणने ऐकले आहे. आता इतर कर्मचाऱ्यांचे पण म्हणने ऐकून घेणार आहे. याबाबत वरिष्ठांनाही कळविले आहे.
- डॉ.शहाजी लोमटे, तालुका आरोग्य अधिकारी धारूर
मी थोडा बिझी आहे. मला आताच काही बोलायचे नाही. मी आपणास थोडा वेळाने कॉल करतो.
- डॉ.कृष्णा पवार, वैद्यकीय अधिकारी, रूई धारूर
मी सध्या पोलीस ठाण्यात आहे. तुम्हाला थोडा वेळात कॉल करतो.
डॉ.अरविंद निकटे, सीचओंचे पती