बीड जिल्ह्यात अपक्षांनी ६ वेळा उधळला गुलाल; यंदा आडसकर, धोंडे, पवार, जगतापांवर लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:34 PM2024-11-19T17:34:23+5:302024-11-19T17:35:49+5:30
माजलगाव, आष्टी, गेवराई आणि बीड मतदार संघातील अपक्ष उमेदवार सध्या प्रचारात आघाडी घेत आहेत.
बीड : जिल्ह्यात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून गुलाल उधळण्याची परंपरा आहे. १९६२ ते आजपर्यंत सहा वेळा अपक्ष उमेदवार हे आमदार झाले आहेत. आता २०२४ च्या विधानसभेतही ८१ अपक्ष उमेदवारा विधानसभा निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये रमेश आडसकर, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार आणि अनिल जगताप हे प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी बनत आहेत. सध्या तरी या सर्व अपक्षांनी प्रमुखांची धाकधुक वाढवली आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत १३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये महायुती, महाविकास आघाडी, इतर प्रमुख पक्षांसह ८१ अपक्षांचाही समोवश आहे. २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रत्येकजण आपल्यालाच उमेदवारी मिळाले, असे सांगत होते. परंतू ऐनवेळी डावलल्याने काहींनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर काहींनी उमदेवारीसाठी पक्षांतर केले. परंतू तेथेही उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केला. माजलगाव, आष्टी, गेवराई आणि बीड मतदार संघातील अपक्ष उमेदवार सध्या प्रचारात आघाडी घेत आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी बनत आहेत.
कोणत्या मतदार संघातून कोण?
गेवराईत भाजपचे दोन वेळा आमदार राहिलेले लक्ष्मण पवार सध्या अपक्ष उमेदवार आहेत. त्यांची अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित आणि ठाकरे गटाचे बदामराव पंडित यांच्याशी लढत आहे. येथे तिसऱ्या आघाडीच्या पुजा मोरेही सक्रीय आहेत. माजलगावात अजित पवार गटाकडून आ.प्रकाश सोळंके, शरद पवार गटाकडून मोहन जगताप हे उभा असून त्यांना रमेश आडसकर या अपक्ष उमेदवाराचे आव्हान असेल. आष्टीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आ.भिमराव धोंडे अपक्ष मैदानात आहेत. त्यांना भाजपचे सुरेश धस आणि अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांचे आव्हान आहे. बीडमध्ये अजित पवार गटाचे डॉ.योगेश क्षीरसागर, शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर, तिसऱ्या आघाडीचे कुंडलिक खांडे यांना अपक्ष उमेदवर अनिल जगताप यांचे आव्हान असणार आहे. सध्या तरी हे चार अपक्ष उमेदवार तुल्यबळ असल्याने प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहेत.
धोंडे, पंडितांना अनुभव
यापुर्वी गेवराई मतदार संघातून १९९५ आणि १९९९ साली बदामराव पंडित हे सलग दोन वेळा अपक्ष आमदार झालेले आहेत. तसेच आष्टीतून १९८० साली भिमराव धोंडे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल करून गुलाल उधळला होता. आता पुन्हा एकदा धोंडे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत तर पंडित ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत.
आतापर्यंतचे अपक्ष आमदार
गेवराई मतदार संघ : बदामराव पंडित (१९९५, १९९९)
माजलगाव मतदार संघ : बाजीराव जगताप (१९९५)
आष्टी मतदार संघ : भिमराव धाेंडे (१९८०), साहेबराव दरेकर (१९९५)
केज मतदार संघ : भागुजी निवृत्ती सातपुते (१९७८)