जयसिंगरावांची हॅटट्रिक, तर केशरकाकू अन् प्रीतम मुंडेंची हुकली; बीडचे आतापर्यंतचे खासदार...
By सोमनाथ खताळ | Published: March 19, 2024 05:48 PM2024-03-19T17:48:42+5:302024-03-19T17:52:26+5:30
लोकसभा निवडणूक : गोपीनाथराव मुंडे हे देखील सलग दोनवेळा झाले खासदार
बीड : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत जयसिंगराव गायकवाड यांनी खासदार होण्याची हॅटट्रिक केली. तर, केशरकाकू क्षीरसागर यांची हॅटट्रिक १९८९ साली जनता दलचे बबनराव ढाकणे यांच्यामुळे हुकली होती. यासोबतच विद्यमान खा. डॉ. प्रीतम मुंडे या देखील दोन वेळा विजयी झाल्या. परंतु, चालू निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून त्यांच्याच ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांचीही खासदार होण्याची हॅटट्रिक हुकली आहे. गोपीनाथराव मुंडे हे देखील सलग दोन वेळा खासदार झाले आहेत.
सध्या राज्यातील राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील समीकरणेही बदलली आहेत. विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करुन त्यांच्या ज्येष्ठ भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून तगड्या उमेदवाराचा शोध सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या खासदारांपैकी केवळ जयसिंगराव गायकवाड हे एकमेव नाव शरद पवार गटाकडून चर्चेत आहे. इतर सर्व नावे ही नवी आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये बीड जिल्ह्याला नवीन खासदार मिळणार आहे. आता तो कोण असणार ? हे ४ जून २०२४ रोजी मतमोजणीनंतर समजणार आहे.
जे विरोधात लढले, तेच पक्षात आले
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गोपीनाथराव मुंडे यांच्याविरोधात सुरेश धस यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २००९ साली रमेश कोकाटे (आडसकर) यांनीही मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. परंतु, गोपीनाथराव मुंडे यांनी या दोघांचाही पराभव केला. आता हे दोघेही भाजपमध्ये आहेत.
रजनीताईंनी केला काकूंचा पराभव
रजनी पाटील यांनी १९९६ साली भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांना भा.रा.काँ.कडून केशरकाकू क्षीरसागर यांनी चांगलीच लढत दिली. परंतु, काकूंचा तेव्हा ताईंनी ५७ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर रजनी पाटील यांनी एकदाही लोकसभेची निवडणूक लढवली नाही. रजनी अशोकराव पाटील या सध्या काँग्रेसकडून राज्यसभेच्या सदस्या आहेत.
अशोकराव पाटील यांना एकदाही गुलाल नाही
अशोकराव पाटील हे अनेकदा लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहिले. परंतु, अद्यापर्यंत तरी त्यांना एकदाही विजयाचा गुलाल उधळता आला नाही. १९९८ साली २ लाख ९४ हजार मते मिळाली, परंतु अवघ्या सहा हजार मतांनी त्यांना जयसिंगराव गायकवाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर १९९९, २०१४ मध्ये देखील त्यांनी निवडणुका लढवल्या.
वर्षनिहाय विजयी उमेदवार / पराभूत उमेदवार
२०१९
प्रीतम मुंडे - भाजप - ६७८१७५
बजरंग सोनवणे - राष्ट्रवादी - ५०९८०७
२०१४ पोटनिवडणूक
प्रीतम मुंडे - भाजप - ९२२४१६
अशोकराव पाटील - भा.रा.काँ.- २२६०९५
२०१४
गोपीनाथराव मुंडे - भाजप - ६३५९९५
सुरेश धस - राष्ट्रवादी - ४९९५४१
२००९
गोपीनाथराव मुंडे - भाजप - ५५३९९४
रमेश आडसकर - राष्ट्रवादी - ४१३०४२
२००४
जयसिंगराव गायकवाड - नॅ. काँ. पा. - ४२५०५१
प्रकाश सोळंके - भाजप - ३७७६३९
१९९९
जयसिंगराव गायकवाड - भाजप - ३३२९४६
राधाकृष्ण पाटील - रा.काँ.पा. - २८१७५६
१९९८
जयसिंगराव गायकवाड - भाजप - ३००३०७
अशोकराव पाटील - भाराकाँ - २९४२०४
१९९६
रजनी पाटील- भाजप - २७९९९५
केशरकाकू क्षीरसागर - भाराकाँ - २२२५३५
१९९१
केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - २६००३५
प्रा. सदाशिव मुंडे - भाजप - १७२४०९
१९८९
बबनराव ढाकणे - जनता दल - २२९४९६
केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस इ - २२७५११
१९८४
केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय- २२१४२१
श्रीधर गीते - अपक्ष - १११०५९
१९८०
केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - २०३८७०
रघुनाथ मुंडे - काँग्रेस यू - १३६३३७
१९७७
गंगाधर बुरांडे - माकप - १९७४९७
लक्ष्मण देशमुख - काँग्रेस - १४५६००
१९७१
पंडित सयाजीराव त्रिंबकराव - भाराकाँ - १८७१३२
गंगाधर बुरांडे - सीपीएम - २३५५१
१९६७
क्रांतिसिंह नाना पाटील - सीपीआय - १२५२१६
एन. के. मंधाणे - भाज संघ - २५०३३
१९६२
द्वारकादास मंत्री - भाराप - ९५७००
बाबर अहेमद हुसेन अत्तार - सीपी आय - ७५१७१
१९५७
रखमाजी धोंडिबा - भाराप - ६६०१३
काशीनाथ तात्याबा - सीपीआय - ५८०९०
१९५२
रामचंद्र परांजपे - पीडीएफ - ६७७५२
श्रीधर वामन नाईक - भाराकाँ- ५८५०१