बीडमध्ये खासदारासह सहा आमदार ‘महायुती’कडे, ‘मविआ’ची होणार कसरत
By सोमनाथ खताळ | Published: April 11, 2024 11:34 AM2024-04-11T11:34:21+5:302024-04-11T11:36:33+5:30
आघाडीकडे एक खासदार अन् एक आमदार : ठाकरे गट अन् काँग्रेसच्या प्रचाराकडेही लक्ष
बीड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात एक खासदार आणि सहा आमदार या संख्या बळामुळे महायुती मजबूत वाटत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे एक खासदार आणि एकच आमदार आहे. त्यातही उद्धवसेना आणि काँग्रेस पक्ष अजूनही प्रचारात फारसे सक्रिय झाले नसल्याचे दिसते. त्यामुळे या निवडणुकीत मविआला कसरत करावी लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीची अद्यापतरी ‘एकला चलो रे’ अशीच अवस्था आहे.
जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष मजबूत आहेत. शिंदेसेना, उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस यांचा फारसा दबदबा नाही. परंतु या पक्षांचाही एक ठरावीक मतदार वर्ग आहे. त्यातच मागील काही महिन्यांत राज्याच्या राजकारणात घडामोडी झाल्याने फाटाफूट झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदेसेना यांची महायुती झाली असून राष्ट्रवादी (शरद पवार गट), उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी झाली. याचा आढावा घेतला असता सध्या महाविकास आघाडीकडे एक राज्यसभेचे खासदार आणि एक विधानसभा आमदार आहेत .त्यामुळे या निवडणुकीत मविआला कसरत करावी लागणार आहे. तर महायुतीकडे एक विधान परिषद, पाच विधानसभा सदस्य तर एक लोकसभा सदस्य एवढे संख्या बळ आहे. परंतु केवळ आमदार-खासदारांच्या संख्याबळावर नव्हे तर मतदारांचा कल कोणाकडे राहील यावर या मतदारसंघाचे भवितव्य ठरणार आहे.
‘वंचित’चा ‘मविआ’लाच फटका? मविआकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे हे उमेदवार असून त्यांच्याकडेही कुणबी मराठा म्हणून पाहिले जात आहे. हिंगे हे मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय आहेत. शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे मैदानात उतरल्या तर याचा फटका या दोघांनाही बसू शकतो. कारण दिवंगत विनायक मेटे यांचेदेखील मराठा आरक्षण लढ्यात योगदान मोठे आहे.
कोणाकडे किती संख्याबळ
महायुती डॉ. प्रीतम मुंडे - लोकसभा सदस्य
धनंजय मुंडे - विधानसभा सदस्य
नमिता मुंदडा - विधानसभा सदस्य
प्रकाश सोळंके - विधानसभा सदस्य
बाळासाहेब आजबे - विधानसभा सदस्य
लक्ष्मण पवार - विधानसभा सदस्य
सुरेश धस - विधान परिषद सदस्य
महाविकास आघाडी
रजनी पाटील - राज्यसभा सदस्य
संदीप क्षीरसागर - विधानसभा सदस्य