महिला सुरक्षा वाऱ्यावर! दारूड्या पाेलिसांने घरात घुसून धरला महिलेचा हात; ग्रामस्थांनी चोपले
By सोमनाथ खताळ | Published: August 1, 2023 04:16 PM2023-08-01T16:16:20+5:302023-08-01T16:23:44+5:30
सुरक्षा करणारे पोलिसांकडूनच महिलांच्या जीवाला धोका? याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
धारूर : धारूर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराने दारूच्या नशेत तालुक्यातील एका गावातील महिलेचा घरी जावून हात धरला. महिलेने आरडाओरडा करताच ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर या दारूड्या पोलिसाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. आता या हवालदाराविरोधात धारूर ठाण्या गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू असून रात्री पर्यंत त्याचे निलंबण होण्याचीही शक्यता आहे.
धारूर पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी सोमवारी रात्री उशिरा दारू पिऊन तालुक्यातील एका गावात गेला. अंधाराचा फायदा घेत एका घरात जावून त्याने महिलेचा हात धरला. यावेळी महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे नातेवाईकांसह ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर या दारूड्या पोलिसाला सर्वांनीच चोप दिला. तेथून त्याला धारूर पोलिसांच्या स्वाधीन केले. मंगळवारी सकाळीच हे सर्व नातेवाईक गुन्हा दाखलसाठी पोलिस ठाण्यात आले, परंतू धारूर पोलिसांनी प्रकरण मिटवून घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतू नातेवाईक निर्णयावर ठाम राहिल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धारूरचे सहायक पोलिस निरीक्षक विजय आटोळे यांनीही हा कर्मचारी आपल्याच ठाण्यातील असल्याचे सांगितले आहे.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
धारूर ठाण्यातील कर्मचाऱ्याने दारू पिऊन गैरवर्तन केल्याचे समजले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रात्रीपर्यंत त्याला निलंबीतही केले जाणार आहे.
- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड
ठाणेदार येणार अडचणीत
पोलिस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत महिलेचा हात धरला. हा प्रकार गंभीर असतानाही पोलिसांकडून गुन्हा दाखल करणे तर सोडाच उलट आक्रमक भूमिका घेणाऱ्या नातेवाईकांवरच रूबाब झाडण्यात आला. एरव्ही गेले की गुन्हा दाखल करून घेणारे पोलिस या प्रकरणात मात्र मिटवून घेण्यासाठी प्रयत्न करत होते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच दुपारपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकारामुळे ठाणेदार विजय आटोळेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संताप
गुन्हा नोंद करणे तर दूरच उलट गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. याबाबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. फेसबुकवर घटनेचा व्हिडिओ शेअर करत एका पोस्ट द्वारे त्यांनी महिला सुरक्षेवर गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला हे. त्या म्हणल्या, '' गृहमंत्री महोदय, जर नागरिकांच्या रक्षणासाठी असणारे पोलीसच गोरगरीब माय माऊलींच्या घरात घुसून गैरवर्तन करत असतील तर मायबाप सरकार तुम्ही सांगा जनतेने न्याय कुणाकडे मागायचा..?''