कोल्हापूरमध्ये ऊसाच्या फडात मुले असतानाही दाखवली बीडमध्ये हजेरी; सुमोटो याचिका दाखल
By सोमनाथ खताळ | Published: August 6, 2024 01:18 PM2024-08-06T13:18:03+5:302024-08-06T13:21:39+5:30
बीडची १८३९ मुले कोल्हापूरमध्ये उसाच्या फडात; 'लोकमत' मधील बातमीवर सुमोटो याचिका
बीड : बीड जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील १८३९ मुले हे कोल्हापूरच्या वेगवेगळ्या ११ कारखान्यांवर ऊसतोडणी काम करणाऱ्या पालकांसोबत होते. ही बाब कोल्हापूरच्या 'अवनी' संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली होती. त्याची यादी मिळताच उलट तपासणी केली. यात ही मुले बीडमधील शाळेच्या हजेरीपटावर उपस्थित असल्याचे उघड झाले होते.
बीड शिक्षण विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे आणि जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे यांनी यासाठी काही शाळांची तपासणी केली होती. हाच प्रकार 'लोकमत'ने १२ मार्च आणि २४ मार्च २०२४ रोजी वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला होता. याचीच दखल घेत मानवी हक्क आयोगाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. याची ३१ जूलै रोजी एक सुनावणी झाली असून पुढील सुनावणी ही २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. यात अवनी संस्थेला बोलावण्यात आले आहे.
यांना केली पार्टी?
याचिकामध्ये प्रधान सचिव शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यात पार्टी करण्यात आले आहे.
यादीची उलट तपासणी केली
अवनी संस्थेने पाठविलेल्या यादीची उलट तपासणी केली होती. तीन शाळांना भेटी दिल्यावर ही मुले कोल्हापूरमध्ये असतानाही त्यांची हजेरी बीडमध्ये असल्याचे दिसले होते. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा करण्यात आली, परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. आता याचिका दाखल झाल्याने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे.
- तत्त्वशील कांबळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान, बीड
कार्यवाही व्हायला हवी
कोल्हापूरमध्ये ८० टक्के ऊसतोड मजूर हे बीड जिल्ह्यातील येतात. त्यांच्या मुलांचे सर्वेक्षण केले होते. त्याची उलट तपासणी केल्यावर अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या. यात ‘लोकमत’ने आवाज उठविल्याने आयोगाने सुमाेटो याचिका दाखल करून घेतली. यात योग्य ती कार्यवाही व्हायला हवी. आता आमच्या संस्थेलाही मुंबईच्या कार्यालयात बाेलावले आहे.
- अनुराधा भोसले, अध्यक्षा, अवनी संस्था, कोल्हापूर
अवनी संस्थेने काय केले होते ?
कारखान्यांना भेटी - ११
कुटुंब संख्या - १९५८
एकूण मुले - १८३९
किती मुले आढळली?
० ते ३ वयोगट - ३३५
४ ते ६ वयोगट - ३५३
७ ते १४ वयोगट - ६५३
१५ ते १८ वयोगट - ४९८