एक असाही निषेध! त्रस्त ग्राहकाने गाढवाला बांधून शहरभर फिरवली इलेक्ट्रिक बाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 02:04 PM2022-04-25T14:04:00+5:302022-04-25T14:04:46+5:30
इलेक्ट्रिक बाईक घेतल्यानंतर सहाच दिवसात बंद पडली
परळी ( बीड ) : येथील ग्राहक सचिन गित्ते यांनी एका कंपनीकडुन खरेदी केलेली इलेक्ट्रिक बाईक अवघ्या सहा दिवसात बंद पडली. ती काही केल्याने पुन्हा सुरु झालीच नाही. कंपनीकडुन कसलाच रिप्लाय येत नसल्याने त्रस्त ग्राहक गित्ते यांनी बंद पडलेली बाईक गाढवाला बांधत परळीतील रस्त्यावरुन ओढत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला.
परळी येथील व्यापारी सचिन गित्ते यांनी दि.16 सप्टेंबर 2021 रोजी 20 हजार रु.भरत एका कंपनीची ऑनलाईन बुकींग केली. 21 जानेवारी 2022 रोजी उर्वरित 65 हजार रुपये भरल्यानंतर त्यांना 24 मार्च रोजी इलेक्ट्रिक बाईक गित्ते यांच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर अवघ्या सहा दिवसातच बाईक बंद पडली. त्यामुळे गित्ते यांनी कंपनीकडे संपर्क साधला. कंपनीचा तंत्रज्ञ येऊनही दुचाकी सुरु झाली नाही. कंपनीकडून हजारो गाड्यांची विक्री होत असताना कुठेच डिलर अथवा तालुका,जिल्हा, विभागीय स्तरावर शोरुम नसल्याने सचिन गित्ते यांनी ग्राहक सेवा केंद्रास व्यथा सांगितली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
रोख रक्कम मोजून घेतलेली बाईक पडल्याने व कंफनीकडुन कसलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्रस्त झालेल्या सचिन गित्ते यांनी रविवार दि.24 एप्रिल रोजी सदरील बंद पडलेली बाईक गाढवाने ओढत गांधिगीरी केली. गाढवाच्या पाठीवर सदर कंपनीचा निषेध असलेले फलक लावला. फसव्या कंपनीपासून सावध रहावे, या बाईक खरेदी करु नका असे आवाहन करत गाढवाच्या पाठीमागे बाईक बांधत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला.