हातावर 'स्नेहा' नावाचे टॅटू असलेल्या इसमाचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 04:56 PM2023-05-31T16:56:24+5:302023-05-31T16:56:28+5:30
मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलीस तपास करत आहेत.
परळी: तालुक्यातील मांडेखेल शिवारात राम नगर तांड्याजवळ मंगळवारी रात्री तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलीस तपास करत आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अद्याप मृताची ओळख पटली नाही. मृताच्या अंगात निळी जीन्स पॅन्ट, बदामी रंगाचे शर्ट व कमरेला बेल्ट, पायात बुट आहे. तसेच हातावर स्नेहा नाव गोंदविलेले आहे. हा प्रकार खुनाचा असावा, तसेच मृत इतर ठिकाणाचा रहिवासी असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पोलिसांनी सुरू केले ओळख पटविण्यासाठी प्रयत्न
आंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले , परळी ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी नारायण गीते , पोउपनि गणेश झांबरे, हवालदार केकान, पोलिस नाईक नवनाथ हरगावकर, सुनील अन्नमवार, येरडलावार, एकुलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.