रब्बीत ही बोगसपणा, पेरणी सव्वातीन लाख हेक्टरची अन् पीकविमा काढला साडेपाच लाख हेक्टरचा

By शिरीष शिंदे | Published: December 30, 2023 04:28 PM2023-12-30T16:28:06+5:302023-12-30T16:29:00+5:30

खरीप हंगामात शासकीय जमिनी शेत दाखवून अनेकांनी पीकविमा भरला होता.

In Rabbi also fraud, sowing of 5.3 lakh hectares and crop insurance taken out for 5.5 lakh hectares | रब्बीत ही बोगसपणा, पेरणी सव्वातीन लाख हेक्टरची अन् पीकविमा काढला साडेपाच लाख हेक्टरचा

रब्बीत ही बोगसपणा, पेरणी सव्वातीन लाख हेक्टरची अन् पीकविमा काढला साडेपाच लाख हेक्टरचा

बीड : रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीसह इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. वास्तविक रब्बीचे अंदाजित पेरणी क्षेत्र ३ लाख ३२ हजार ३५३ असून, २८ डिसेंबरपर्यंत ३ लाख २० हजार ९४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परंतु जिल्ह्यातील १२ लाख ३८ हजार ७२ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ६७ हजार २८९ हेक्टरचा पीकविमा उतरवला आहे. म्हणजेच २ लाख ४७ हजार १९५ हेक्टरवर अतिरिक्त विमा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे अधिकचा पीकविमा कोणी भरला, यासाठी कृषी विभाग व पीकविमा कंपनीला क्षेत्रीय पडताळणी करावी लागणार आहे. 

रब्बी हंगामात पेरणी केलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी पीकविमा भरण्यास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती. पीकविमा वेबसाइट हँग होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीकविमा भरता आला नव्हता. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पीकविमा भरण्यासाठी जवळपास तीन दिवसांची मुदत वाढवून दिली होती. १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत रब्बी जिरायत व बागायत ज्वारीसाठी शेतकऱ्यांनी विमा भरला. दरम्यान, १५ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. आता विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची अंतिम आकडेवारी समोर आली असता पुन्हा अतिरिक्त विमा भरल्याचा प्रकार समोर आला आहे. 

पुन्हा घ्यावा लागेल शोध
खरीप हंगामात शासकीय जमिनी शेत दाखवून अनेकांनी पीकविमा भरला होता. मागच्या वेळीसुद्धा अतिरिक्त पीकविमा भरल्याचे ‘लोकमत’ ने समोर आणल्यानंतर क्षेत्रीय तपासणी झाली होती. काही मोजक्या लोकांनीच पीकविमा कंपनी व शासनाचा पैसा लाटण्याचा प्रयत्न केला होता. वेळीच हा प्रकार समजून आल्याने अतिरिक्त विमा भरणाऱ्यांचा पीकविमा रद्द करण्यात आला आहे. आता रब्बी हंगामात सुद्धा अतिरिक्त विमा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा कोणी अधिक क्षेत्रावर कोठे विमा भरला, याची पडताळणी करावी लागणार आहे. अशा बोगस शेतकऱ्यांमुळे कृषी विभागासह पीकविमा कंपनीचा पैसा व वेळ वाया जात आहे.

३० टक्के जास्तीचा विमा अपेक्षित
एकूण क्षेत्राच्या ३० टक्के जास्तीचा विमा शेतकऱ्यांनी उतरविणे अपेक्षित आहे. एखादा शेतकरी थोडेफार क्षेत्र वाढवून दाखवू शकतो. परंतु त्यापेक्षा अधिकचा विमा हा क्षेत्र वाढवून पैसे लाटण्याचा डाव असल्याचे मानले जाते. खरे तर, ५० एकर, १०० एकर असे क्षेत्र दाखवून विमा भरणारे हे शेतकरी नसतात. हे बाहेर राज्य व जिल्ह्यातील असल्याचे यापूर्वीच्या माहिती मधून समोर आलेले आहे.

अशी आहे पेरणी व विमा
तालुका- एकूण पेरणी क्षेत्र- पेरणी झालेले क्षेत्र- विमा काढलेले क्षेत्र

बीड - ४३८१८-३४०३३-६९१४०
पाटोदा - ३५३०५-३०६४४-३८८९०
आष्टी - ५७९८४-५२५८६-६३५९९
शिरुर-२१८७२-१५५६५-३०५९२
माजलगाव-१९०७७-१९८६३-४६२००
गेवराई-३४०७६-१९७७५-७८०००
धारुर-९४९२-१३६१३-३०८०३
वडवणी-४०८५-३९९७-१५७४०
अंबाजोगाई-४८०७४-५६६६७-६२७२४
केज-३८७६३-६५१८९-७८०५०
परळी-१९८०७-८१६२-५३५४५
एकूण -३३२३५३-३२००९४-५६७२८९

Web Title: In Rabbi also fraud, sowing of 5.3 lakh hectares and crop insurance taken out for 5.5 lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.