पोळ्याच्या मिरवणुकीत बैलजोड्यांचा मान, मागील ७५ ट्रॅक्टरच्या ताफ्याने वाढवली शान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 06:34 PM2022-08-27T18:34:21+5:302022-08-27T18:34:36+5:30
बैलजोड्यांची संख्या कमी झाली असून त्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (बीड) : तालुक्यातील सादोळा येथे पोळा सणानिमित्त बैलजोड्यांसोबतच ट्रॅक्टरची ही मिरवणूक काढण्यात आली. गावातील ७५ ट्रॅक्टरची मिरवणूक काढत आगळावेगळा पोळा सण साजरा करण्यात आला. या ट्रॅक्टर पोळ्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.
महाराष्ट्रात परंपरेनुसार पोळा सण साजरा करण्यात येतो. यानिमित्त दोन दिवस शेतात राब राबणारे बैल यांना काम करू दिले जात नाही. त्यांना आंघोळ घालून, रंग रंगोटी करत विविध साजाने सजवले जाते. परंतु, मागील काही वर्षांपासून विविध मशीनद्वारे शेतीतील कामे होऊ लागले आहेत. यामुळे शेतातील बैल बारदाना कमी होऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ७०-८० बैल राहत त्यांच्याकडे पाच ते दहा बैल राहिली आहेत. तर काहींच्या घरी तर बैलजोडी दिसेनासी झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात चिखलांचे बैलांवर पोळा साजरा केला जात आहे.
माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे बैलजोड्यांची संख्या कमी झाली असून त्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी १०५ बैल जोडयासोबतच ट्रॅक्टरची पण मिरवणूक पोळ्यानिमित्त काढली होती. गावातील जवळपास ७५ ट्रॅक्टर यात सामील झाले. डिजेच्या तालावर ही मिरवणूक काढल्याने वेगळाच नजारा गावात दिसून आला. ग्रामस्थांनी उत्साहाने काढलेल्या बैलजोडी आणि ट्रॅक्टरच्या मिरवणुकीची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.
सादोळा शिवारात सात हजार एकर जमीन असून अगोदरच्या काळामध्ये 5-10 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांकडे एक बैल जोडी होती. सध्या आधुनिकरण झाले व बळीराजाही काळानुसार बदलला. हळूहळू बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली. यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी बैलजोडीसोबतच ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्याचे ठरवले व ही मिरवणूक यशस्वी देखील झाली.
- संजय सोळंके , शेतकरी सादोळा