समाजाच्या लढ्यात आपलेच फितूर, पक्षाला नाही तर जातीला बाप माना: मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 02:37 PM2024-03-14T14:37:54+5:302024-03-14T14:38:11+5:30
तुम्ही पक्षाला एवढे मानता तर पक्ष आपल्या मागण्या का मान्य करत नाही, जरांगे पाटील यांनी केला सवाल
अंबाजोगाई :- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. सगेसोयरेची व्याख्या लागू करावी यासाठी गेल्या सात महिन्यांपासून मराठा समाजासाठी लढा देत आहे. मात्र माझ्या विरोधात आपल्याच जातीचे लोक उठले आहेत. जर तुम्ही पक्षाला एवढे मानता तर पक्ष आपल्या मागण्या का मान्य करत नाही, असा सवाल उपस्थित करून पक्षाला नाही तर जातीला बाप माना असा सल्ला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
अंबाजोगाईत साधना मंगल कार्यालयात बुधवारी रात्री सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी बैठक आयोजित केली. मात्र उपस्थितांची गर्दी पाहता या बैठकीचे आयोजन जाहिर सभेत झाले. या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणाचा विषय एकजुटीने अंतिम टप्प्यात आला आहे. आता मराठ्यांनी माघार घेवू नये. सगेसोयरे व ओबीसीतून आरक्षण याच आपल्या प्रमुख मागण्या आहेत. मराठा समाजाच्या मुला-बाळासाठी माझा लढा सुरू असताना आपलेच लोक माझ्याशी फितूरी करत आहेत. त्यांना समाज त्यांची जागा दाखवून देईल.
आपल्या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. फडणवीस यांनी माझ्या विरूद्ध पोलिस कारवाई सुरू केली आहे. इतरांना वेगळा न्याय व मला वेगळा न्याय दिला जात आहे. माझ्या प्रमाणे फडणवीसांनी उपोषण केल्यास त्यांना वजन कमी करण्यासाठी दुसरा पर्याय लागणार नाही. सलाईन लावायला शिरही सापडणार नाही. यासाठी माझ्या बाजूला उपोषणाला बसा असे म्हणत त्यांनी फडणवीसांनावर कडाडून टिका केली. राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून सभेस प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित महिलांनी मनोज जरांगे पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी सभेच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
तर जनताच तुमचा करेक्ट कार्यक्रम करील
मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्ही मराठ्यांच्या मनातून उतरलात. जातीसाठी मी लढा देत असताना माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा तुम्ही करीत आहात हा समाज समजदार आहे. योग्य वेळी तोच तुमचा करेक्ट कार्यक्रम करील अशा शब्दात जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर आपली तोफ डागली.
तो पर्यंत पुढार्यांनी आमच्या दारात येवू नये-:
मी मतदार, सगेसोयरे अध्यादेश जो पर्यंत लागू होत नाही. तोपर्यंत पुढार्यांनी आमच्या दारात येवू नये असे पोस्टर्स सभेच्या ठिकाणी प्रत्येकाच्या हातात झळकत होते. या पोस्टर्सचा संदर्भ देत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पोस्टर्सचा अंबाजोगाई पॅर्टन संपुर्ण राज्यात दिशादर्शक ठरणारा आहे. ते आपल्याला त्यांच्या दारात येवू देत नाहीत. मग आपण तर कशाला येवू द्यायचे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत हा लढा सुरूच राहिल असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.